8 October 2024 11:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | SBI च्या 'या' फंडामुळे गुंतवणूकदारांची रोज दिवाळी, पैसा 4 पटीने वाढतोय, फायदा घ्या - Marathi News NBCC Share Price | PSU शेअरने 250 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा दिला, आता स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत अपडेट, मल्टिबॅगर शेअरवर होणार परिमाण, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर पुन्हा फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ओव्हरसोल्ड झोनच्या जवळ, 2800% परतावा देणारा शेअर BUY करावा की Sell - Marathi News IRFC Share Price | IRFC शेअर टेक्निकल चार्टवर 50% पुलबॅकचे संकेत, तज्ज्ञांनी दिला सल्ला, स्टॉक BUY करावा का - Marathi News Vedanta Share Price | रॉकेट तेजीचे धावणार वेदांता शेअर, FII आणि म्युच्युअल फंड कंपन्यांकडून खरेदी, ब्रोकरेज बुलिश - Marathi News
x

Rajaram Raje Bhosale | शंभूराजेंच्या मृत्यूनंतर रायगडाला झुल्फिकारखानाचा वेढा | तर राजाराम राजेंचा गनिमी कावा

Maratha Rajaram Raje Bhosle

मुंबई, १३ सप्टेंबर | छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले आणि आपल्या पुढील पिढयांना एक मोठी जबाबदारी सोपविली, ती म्हणजे स्वराज्य रक्षणाची. होय ! स्वराज्य निर्माण करणे जितके कठीण तितकेच ते जतन करणे देखील कठीण होते. शिवरायांच्या निधनानंतर शंभूराजांनी स्वराज्य जपले आणि वाढविले देखील, परंतु शंभूराजांच्या निधनानंतर मराठ्यांचा स्वराज्यावरील जम सुटत होता, राजाराम पुढील राजे होणार होते आणि त्यांच्याकडून स्वराज्य जतन करण्याचे प्रत्येक प्रयत्न करण्यात आले. याच काळात औरंगजेबाने आपला एक सरदार रायगडावर पाठवून रायगडाला वेढा दिला, आणि राजाराम राजांना पकडण्याची योजना केली. राजाराम राजे यशस्वीरित्या तेथून बचावले आणि पुढे त्यांनी जिंजी गाठली.

Rajaram Raje Bhosale, शंभूराजेंच्या मृत्यूनंतर रायगडाला झुल्फिकारखानाचा वेढा, तर राजाराम राजेंचा गनिमी कावा –  Maratha Rajaram Raje Bhosle war with Zulfiqar Khan at Gingee in Marathi :

आज पाहूया हाच रायगड ते जिंजी प्रवास:
आपले शंभूराजे जेरबंद केले गेले, तेंव्हा येसूबाई, शाहू व राजाराम राजे आणि परिवारातील इतर मंडळी रायगडावरच होती. संभाजी राजे नसल्याने व शाहू वयाने लहान असल्याने राज्यकारभाराची जबाबदारी राजाराम राजांकडे सोपविण्यात आली. मराठी स्वराज्य पुन्हा मजबूत करण्याचे सगळे प्रयत्न सुरु झाले. या गोष्टींची चाहूल औरंगजेबाला लागताच त्याने मराठ्यांचा नायनाट करायचे नक्की केले. औरंगजेबाने इतिकादखान नावाचा एक सरदार या मोहिमेवर रवाना केला. हा इतिकादखान म्हणजेच औरंगजेबाचा वझीर आसदखान याचा मुलगा.

याच इतिकादखानला झुल्फिकारखान असे देखील ओळखले जात होते. या झुल्फीकारखानाने सरळ रायगडाला वेढा दिला. हा काळ होता १६८९ चा. १२ फेब्रुवारी पासून राजाराम राजांची कारकीर्द सुरु झाली आणि ती सुरु होते ना होते तोच २५ मार्च रोजी झुल्फीकारखानाने आपल्या फौजेसह किल्ले रायगडाला वेढा दिला. स्वराज्याच्या राजधानीत वेढा पडल्याने अचानक गोंधळ उडाला होता. काहीही करून किल्ला लढविणे भाग होते.

येसूबाई व गडावरील मंडळींच्या एकमताने असे ठरले कि येसूबाई शाहूबाळांसोबत रायगडावरच थांबतील आणि महत्वाची माणसे व काही सैन्य घेऊन राजाराम राजांनी गड सोडावा, आणि शक्य होईल त्या परीने मुघलांवर हल्ला करावा आणि इकडे रायगड इतका भरभक्कम होता कि वेढ्यात सहज तग धरू शकत होता. साधारण ५ एप्रिल १६८९ रोजी आपल्या काही साथीदारांना, सैन्याला आणि पत्नीला घेऊन राजाराम राजांनी रायगड सोडला व प्रतापगड गाठला. रायगडाबाहेर पडून मराठा सैन्यांनी बराच धुमाकूळ घालत मुघलांना त्रस्त करून सोडले. याच काळात संताजी, धनाजी सारख्या वीरांनी औरंगजेबाच्या छावणीवरील सोन्याचा कळस लुटून आणला होता.

रायगडाचा वेढा चालू असतांनाच एके दिवशी संताजीने झुल्फीकारखानाच्या सैन्यावर अचानक हल्ला चढविला आणि बरीच लूटमार करून राजाराम राजांना ती लूट नजर केली. जवळजवळ ६-७ महिने झुल्फीकारखानाने हा वेढा चालू ठेवला होता. शेवटी रायगड भेदला गेला आणि तोसुद्धा आपल्याच काही सरदारांच्या फितुरीमुळे आणि रायगडावर असलेले आपले शाहू आणि येसूबाई साहेब औरंगजेबाच्या कैदेत पडले. राजाराम राजे प्रतापगडावरून पुढे जात पन्हाळा किल्ल्यावर आश्रयाला आले. येसूबाई आणि शाहू कैदेत असूनही समाधान न झाल्याने औरंगजेबाने राजाराम राजांनाही संपविण्याचा व शक्य तितके मराठ्यांचे गड-किल्ले काबीज करण्याचा मनसुबा केला.

War between Maratha Rajaram Raje Bhosle and Zulfiqar Khan at Gingee :

इतिकादखान म्हणजेच झुल्फिकारखान याला रायगडच्या वेढ्यानंतर औरंगजेबाने पुन्हा आपला नवा मनसुबा पूर्ण करण्यासाठी पाठविले. इतिकादखानाने राजाराम राजांचा पाठलाग सुरूच ठेवला आणि शेवटी पन्हाळा किल्ल्याला देखील वेढा दिला, आता मात्र राजाराम राजांनी आपल्या वडिलांचीच युक्ती आचरणात आणून पन्हाळ्यावरुन पलायन करायचे नक्की केले. या पन्हाळ्यावरून राजाराम राजे विशाळगडावर आले आणि विशाळगडावरही इतिकादखान हल्ला करेल अशी चिन्हे होतीच.

अतिशय मोठा पेच प्रसंग निर्माण होत होता, आपण एक पाऊल टाकावं तर शत्रूदेखील पावलावर पाऊल देऊन मागावर येतो आहे आणि अशाने स्वराज्याला अस्थिरता निर्माण होते आहे हे राजाराम राजांच्या ध्यानात आले आणि आता विशाळगड देखील सोडण्याचा ते विचार करू लागले. रायगड काबीज केल्यानंतर एकामागून एक असे किल्ले मुघल आपल्या ताब्यात घेत आहे आणि आता तर पन्हाळा देखील त्यांच्या ताब्यात गेल्याने विशाळगडाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला होता आणि जिवंत राहण्यासाठी आता येथूनही पलायन करणे भाग होते हे राजाराम राजांना कळून चुकले.

अशी केली जिंजीकडे कूच:
आपल्या सरदारांची व विश्वसनीय माणसांची एक सभा विशाळगडावर भरविली गेली आणि राजाराम राजांनी सल्ला – मसलत चालू केली. या चर्चेत अनेक योजना सुचविल्या गेल्या, परंतु काही ना काही अडचण समोर होतीच. शेवटी, शिवरायांची पलायनाची युक्ती नजरेसमोर आली आणि त्यानुसारच आपणही पलायन करावे असे ठरले. हा निर्णय सर्वानाच मान्य झाला. राजाराम राजे सुरक्षित बाहेर पडेपर्यंत विशाळगडावरून मुघल सैन्याला कडवा प्रतिकार केला जाईल आणि एकामागून एक असे मुघलांवर सलग हल्ले करून त्यांना विचलित केले जाईल असे आश्वासन विशाळगडावरून मिळाले.

विशाळगडावरील बरेच सैन्य राजाराम राजांच्या सोबतीला देण्यात आले आणि महाराष्ट्रातून आपला वेष बदलून जिंजीमध्ये प्रवेश करायचे नक्की ठरले. ठरल्याप्रमाणे राजाराम राजांचे सैन्य छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागले गेले, आणि आपला वेष पालटून ते प्रवास करू लागले. राजाराम राजे व त्यांचे सोबती धार्मिक वेष परिधान करून प्रवास करू लागले. अनेक साधनांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे राजाराम राजांनी एका वाण्याच्या रूपात प्रवास केला आणि हि खबर देखील औरंगजेबाला लागली. त्याने आपल्या सरदारांना पत्र पाठवून राजाराम राजे तुमच्या राज्यात दिसताच त्यांना बंदी करून समोर आणण्याचा हुकूम दिला.

एके दिवशी वेषांतर करून राजाराम राजे बंगलोर येथे उतरले असता तेथे काही गुप्तहेरांनी राजाराम राजे असल्याची बातमी फोडली आणि आता मुघल आपल्या पाठी येतील हि खबर मराठा सरदारांना लागताच मोजके सैन्य घेऊन राजाराम राजांनी पुढील अंतर कापावे असे ठरले, आणि लवकरात लवकर सर्वानी जिंजित एकत्र आले पाहिजे हे नक्की करण्यात आले. ठरल्याप्रमाणे राजाराम राजे आणि बाकी साथीदार जिंजीला पोहोचले. राजाराम राजे शेवटी शिवपुत्रच, त्यामुळे आपला मुलुख सोडण्यापूर्वी राजाराम राजांनी प्रल्हाद निराजी यांच्याशी सल्लामसलत करून निळोपंत यांना पेशवेपद सोपविले.

रामचंद्र बावडेकर यांना ‘हुकूमपन्हा’ असे पद दिले आणि मराठ्यांचे अनेक किल्ले आणि प्रदेशांच्या बंदोबस्ताची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. कान्होजी आंग्रे व काही माहितगार मंडळींना लढाऊ गलबतींचे काम सोपविले आणि आणखीन बऱ्याच लोकांना महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या. जिंजीला आल्यावर राजाराम राजांनी आपले अष्टप्रधान मंडळ नेमले आणि जिंजीला स्वराज्याची नवी राजधानी घोषित केली.

जिंजीला वेढा:
जिंजीला स्वराज्याची नवी राजधानी बनविली, अनेक महत्वाचे सरदार आणि मराठे मंडळी एकाच ठिकाणी एकाच वेळी आपल्या तावडीत सापडतील या हेतूने औरंगजेबाने इतिकादखान म्हणजेच झुल्फिकारखान याला आता जिंजीवर स्वारी करण्याचे सुचविले. आदेशाप्रमाणे झुल्फिकारखान जिंजीला आपले सैन्य घेऊन गेला परंतु, जिंजीला गेल्यावर इतका मोठा प्रदेश पाहून झुल्फीकारखानाला कळून चुकले कि आपले तुटपुंजे सैन्य जिंजीवर वेढा किंवा हल्ला करण्यासाठी पुरेसे होणार नाही. झुल्फीकारखानाने शेवटी औरंगजेबाला पत्र लिहून हकीकत सांगून अजून वाढीव सैन्याची मागणी केली व उत्तर येईपर्यंत तो थोड्या फौजेसोबत आसपासच्या प्रदेशात राहिला.

जिंजी काबीज करण्याचा मुघलांचा मनसुबा असतांना मात्र मराठ्यांच्या महाराष्ट्रातील फौजांनी मुघलांच्या नाकी दम करून ठेवला होता. मुघलांच्या अनेक टोळ्यांवर मराठ्यांनी अचानक हल्ले केले आणि पुढे मराठ्यांना संताजी वगैरे मंडळी जिंजीहून येऊन मिळाली. मग तर मराठ्यांनी अजूनच उपद्रव केला आणि मुघलांच्या तोंडचे पाणी पळविले. मधील कालखंडात मराठ्यांची छोटी समजली जाणारी फौज बरीच प्रबळ होऊन काही ना काही राजकीय हालचाली जसे काही मुघल प्रदेश लुटणे, टोळ्यांवर हल्ला करणे, छोट्यामोठ्या चकमकींत मुघलांचा पराभव करून मुघलांना जगणे मुश्किल केले होते.

या मराठ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आता मात्र औरंगजेबाने ठरविले कि पहिले आपण जिंजीवर हल्ला केला पाहिजे तरच या फौजांना आवर घालता येईल. ठरल्याप्रमाणे औरंगजेबाने त्याचा मुलगा कमबक्ष आणि त्याचसोबत आसदखान याला सैन्य देऊन रवाना केले आणि जिंजीला वेढा दिला. हा वेढा देण्यास आपल्याला न सांगितल्यामुळे झुल्फिकारखान नाराज झाला आणि याच नाराजीचा फायदा राजाराम राजांनी घेतला. त्यांनी सरळ झुल्फीकारखानाशी बोलणी केली व संधान बांधले आणि कमबक्षचा वेढा फोडण्यात झुल्फीकारखानाने छुपी मदत करावी अथवा तसे शक्य नसल्यास कमबक्ष वगैरे मंडळींची योजना इत्यादी माहिती राजाराम राजांना पुरवावी.

इकडे महाराष्ट्रात संताजी, धनाजी व बाकी सैन्य धुमाकूळ घालून, धनाजीला काही फौजेसह जिंजीला धाडले गेले आणि येताच त्यांनी मुघलांची ठाणी मारली आणि हा हल्ला चालू असतानाच राजाराम राजांच्या जिंजीतील फौजांनीसुद्धा एकाएकी मुघलांवर हल्ला केला. हे सगळं इतक्या जलद झालं कि आपले सैन्य गोळा करून प्रतिकार करण्यास देखील कमबक्षला वेळ उरला नाही.

आता आपण पेचात पडलो हे पाहताच मुघलांनी तहाची बोलणी सुरु केली परंतु, हा तह औरंगजेबाला मान्य झाला नाही, त्यामुळे त्याने पुन्हा झुल्फीकारखानाला जिंजीला वेढा देण्याचे काम सोपविले आणि हे काम करण्यात तो आढेवेढे घेऊ लागल्याने झुल्फीकारखान राजाराम राजांशी मिळालेला तर नाही असा संशय औरंगजेबाला आला. आपले बिंग फुटू नये यासाठी झुल्फीकारखानाने वेढा देण्याला होकार देऊन राजाराम राजांची भेट घेतली आणि मला वेढा देणे भाग असल्याचे सांगितले. शेवटी राजाराम राजे व खान यांच्यामध्ये असे ठरले कि राजाराम राजे या वेढ्यातून निसटून जातील आणि हे शहर काबीज केल्यावर जिंजीमध्ये राजाराम राजांचे कुटुंब झुल्फीकारखानाने कैद करून राजाराम राजांच्या ओळखीतील माणसाकडे सुरक्षित ठेवावीत.

ठरल्याप्रमाणे वेढा पडण्याआधी राजाराम राजे आपल्या साथीदारांसह पसार झाले व सरळ विशाळगड गाठला आणि काही दिवसातच मुद्दाम झुल्फीकारखानाने जिंजी काबीज केले. ठरल्यानुसार राजाराम राजांचे कुटुंब कैद करून गुप्तपणे शिर्के यांच्याकडे सुरक्षित सोपविले आणि पुढे ते सुरक्षितपणे राजाराम राजांकडे पोहोचविण्यात आले. अशाप्रकारे राजाराम राजांनी स्वराज्य रक्षणाचे शक्य तेवढे सगळे प्रयत्न केले आणि मराठी फौजा एकत्र करून मुघलांना कडवा जवाब दिला. शिवरायांप्रमाणेच त्यांनीही वेळप्रसंगी शक्ती आणि युक्तीचा वापर करून मुघलांच्या नाकी दम आणला. शिवरायांनी पुढील पिढीवर सोपविलेली स्वराज्य रक्षणाची जबाबदारी संभाजी राजांनंतर देखील राजाराम राजांनी मोठ्या हिम्मतीने निभविली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Story Title: Maratha Rajaram Raje Bhosle war with Zulfiqar Khan at Gingee in Marathi.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x