7 January 2025 11:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स Redmi 14C 5G | 10 हजारांचा बजेट असेल तर, Redmi 14C 5G सिरीजवर मिळतेय बंपर सूट, फीचर्सबद्दल जाणून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये तेजीचे संकेत, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Bharat Dynamics Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार स्टॉक, टार्गेट नोट करा - NSE: BDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

Truth of Chhatrapati Shivaji Maharaj Death | शिवरायांच्या मृत्यूबद्दल असलेले गैरसमज आणि ते खोडून काढणारे पुरावे

Truth of Chhatrapati Shivaji Maharaj Death

मुंबई, १४ सप्टेंबर | प्रत्येक माणसाने आपल्या मनात दोन तारखा साठविल्या आहेत. एक आहे अतिशय मंगल बातमी देणारी तारीख, आणि एक आहे महाराष्ट्राला पोरकं करणारी तारीख. पहिली तारीख आहे १९ फेब्रुवारी १६३०. या दिवशी महाराष्ट्राला स्वाभिमानाने जगणं शिकवणारे आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि तो दिवस इतिहासात सोनेरी अक्षरात कोरल्या गेला. दुसरी तारीख आहे ०३ एप्रिल १६८० या दिवशी महाराष्ट्र खऱ्या अर्थानं पोरका झाला. प्रत्येक मनात एक अस्थिरता निर्माण झाली आणि कधीही भरून न निघणारी पोकळी तयार झाली, कारण या दिवशी श्री छत्रपती शिवाजी महाराज अवघे ५०वर्षांचे आयुष्य जगून निधन पावले.

शिवरायांच्या मृत्यूबद्दल असलेले गैरसमज आणि ते खोडून काढणारे पुरावे – Truth of Chhatrapati Shivaji Maharaj Death in Marathi :

शिवरायांचे निधन होणे हि बाबच मनाला रुचत नाही. या घटनेचे वर्णन करणेच मुळी जमत नाही, कारण तितके शब्दही पुरे पडत नाहीत. शिवरायांच्या मृत्यूबद्दल अनेक वावड्या उठविल्या गेल्या आणि अजूनही उठविल्या जातात. अनेकवेळी अनेकांनी केलेल्या शिवरायांच्या मृत्यूच्या उल्लेखात सोयराबाई साहेबानी शिवरायांना विषबाधा करविली असे सांगितले जाते, परंतु याला दुजोरा देणारा कोणताही दुसरा पुरावा सहसा सापडत नाही. त्यामुळे या बातमीत काहीही तथ्य नाही हे समजून येते. विश्वसनीय आणि ऐतिहासिक पाठपुराव्यांचा असलेला आधार यामुळे हे नक्कीच समजते कि शिवरायांचा मृत्यू हा निश्चितच अतिशय गंभीर ज्वराने झाला आहे. अनेक साधनांमध्ये ज्वर, विषमज्वर, नवज्वर, जुलाब आणि संभ्रमात जाणे अशी अनेक कारणे दिलेली देखील सापडतात.

आज शिवरायांच्या निधनाबद्दल असलेले आपले गैरसमज आपण काढून टाकुयात:

मृत्यूबद्दल वावड्या आणि त्याचे खंडन:
शिवरायांच्या नैसर्गिक मृत्यूवर आक्षेप घेऊन अनेक साधनांमध्ये त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचे उल्लेख आले आहेत. या उल्लेखांची आपण शहानिशा करू. पहिला उल्लेख येतो तो ‘शिवदिग्वीजय’ या बखरीत. या बखरीत सोयराराणीसाहेब, महाराजांवर नाराज व क्रोधीत असल्याने सूडाच्या भावनेत होत्या, शंभुराजांना गादीवर न बसविता राजाराम राजांना हक्क द्यावेत हा त्यांचा मनसुबा महाराजांना मान्य न झाल्याने सोयराबाईंनी महाराजांवर विषप्रयोग केल्याचा उल्लेख या बखरीत येतो. आता मुद्दा असा कि सर्वप्रथम, हि बखर कोणी लिहिली हि माहिती समोर आलेली नाही, परंतु हि बखर १९ व्या शतकातील आहे हे समजते.

या बखरींतील घटनादेखील बऱ्याच चुकीच्या आहेत. सईबाई या महाराजांच्या राज्याभिषेकाच्या आधीच निधन पावल्या हे जगजाहीर असताना देखील या बखरीत सईबाई राज्याभिषेकाला उपस्थित होत्या असा उल्लेख येतो. आता असे असल्यावर या बखरीच्या सत्यतेबद्दल नक्कीच शंका वाटते. विषप्रयोगाचा दुसरा उल्लेख येतो तो म्हणजे ‘मल्हार रामराव चिटणीस’ यांच्या बखरीत. हि बखर देखील १९ व्या शतकात लिहिली आहे. विषप्रयोगाच्या घटनांना उलगडणाऱ्या या दोन्ही बखरी शिवरायांच्या मृत्यूनंतर सुमारे १५० – २०० वर्षांनी लिहिल्या गेल्या, आणि विषप्रयोगाचा शिवरायांच्या समकालीन असलेला कोणताही पुरावा सापडत नाही, यावरून हा विषप्रयोगाचा आरोप बिनबुडाचा सिद्ध होतो.

अनेक इंग्रजी पत्रांमध्ये अशी बातमी सापडते कि शिवरायांच्या न्हाव्याने त्यांना विष दिले आणि शिवरायांचा मृत्यू झाला, परंतु हि बातमी सुमारे इसवी सन १६७५ – ७६ मधील आहे, म्हणजेच शिवरायांच्या मृत्यूच्या ५ वर्षे आधी, त्यामुळे साहजिकच हि अफवा आहे हे उघड होते. याच काळात अनेक इंग्रजी पत्रांमध्ये शिवरायांच्या मृत्यूचा उल्लेख येतो, परंतु हे उल्लेख देखील त्यांच्या वास्तविक मृत्यूच्या ४/५ वर्षे आधी आलेले आहेत, त्यामुळे या अफवा आहेत हे सिद्ध होते.

आजाराचे उल्लेख:
शिवरायांना विषबाधा करविली गेली याचे राजांच्या समकालीन असलेले कोणतेही पुरावे सापडत नाहीत परंतु, राजांच्या आजारपणाबद्दल अनेक ठिकाणी उल्लेख आपल्याला समकालीन साधनांमध्ये दिसून येतो. शिवरायांच्या सेवेत असलेले ‘दत्ताजी वाकनीस’ यांच्या ९१ कलमी बखरीत असे उल्लेख आले आहेत कि शिवरायांची प्रकृती सध्या अतिशय थकलेली आहे, काही ना काही बिघाड त्यांच्या प्रकृतीमध्ये दिसून येतो आहे. अनेक छोट्या – मोठ्या मोहीम करताना देखील राजांचे शरीर थकून जात होते व प्रकृती खालावत होती. महाराज औरंगझेबाच्या तावडीतून सुटून आले तेव्हाही ते आजारी असल्याचे समजते. धाकटे पुत्र राजाराम यांच्या विवाहासमयी देखील राजांची प्रकृती खालावली होती.

अनेक इंग्रजी पत्रांमध्ये सुद्धा आपल्याला शिवराय आजारी असल्याचे समजते. एका इंग्रजी साधनात शिवरायांनी इंग्रजांकडून काही औषधे मागविल्याच्या नोंदी आहेत. हि औषधे मुख्यत्वे विषमज्वर या आजारावर उपाय करण्यासाठी उपयोगी आहेत असे आढळून येते, त्यामुळे शिवरायांना विषमज्वर झाला होता हि गोष्ट समोर येते. अशाच एका इंग्रजी पत्रव्यवहारांत शिवरायांना ‘ब्लडी फ्लक्स’ ने ग्रासले, व त्याचमुळे त्यांचा मृत्यू झाला हे समजते.

हा आजार अशा माणसांना होतो जे कायम पशु – पक्ष्यांच्या आसपास असतात. त्यांच्यातील जिवाणूंमुळे हा आजार होतो. ‘ब्लडी फ्लक्स’ या आजारात रक्ताचा अतिसार होतो, जिवाणूंचा सामना करताना शरीराचे तापमान भयंकर वाढते व रोगी दगावतो. हि इंग्रजी बातमी शिवरायांच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच छापून आली होती.

शिवाजी महाराजांच्या आजाराचे निदान असे झाले:
या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्याला हे नक्कीच समजून येते कि विषप्रयोग वगैरे सगळ्या बातम्या निव्वळ बनाव आहेत. शिवरायांचा मृत्यू हा प्रदीर्घ आजाराने झाला आहे, आणि याला दुजोरा देणारी अनेक साधने उपलब्ध आहेत. शिवराय अगदी बालवयापासूनच स्वराजनिर्मितीच्या ध्यासाने वेडे होते, स्वराज्यासाठी वाट्टेल ती जोखीम शिवरायांनी घेतली आणि अतोनात कष्ट घेतले. नीट पाहिले तर लक्षात येते कि शिवरायांनी अगदी लहानपणापासूनच धावपळीला सुरुवात केली, अनेक लढाया केल्या, अनेक मोठमोठ्या शत्रुंना चकविले आणि बरीच आव्हाने पेलली. शिवरायांचे बरेचसे आयुष्य हे लढाई करण्यात, घोडयावर बसून प्रवास करण्यात, मोहिमांमध्ये, छोट्या – मोठ्या चकमकीत गेले.

शिवराय अनेक ठिकाणी वास्तव्यास होते आणि प्रत्येक ठिकाणी वेगळे वातावरण असे. कधी भर दुपारी, तर कधी गोठवून टाकणाऱ्या थंडीत आणि कधी समोरचे सुद्धा दिसू नये इतक्या प्रचंड पावसात शिवरायांनी दौड केली आहे. शिवरायांच्या मनातली इच्छाशक्ती प्रबळ असूनही त्यांचे शरीर थकत होते, आणि तरीही स्वराज्यावरील संकटे कमी होत नव्हती. त्यामुळे पुढील उपाय – योजनांसाठी शिवरायांची बरीच दगदग होत होती, आणि अशातच शरीराने साथ देणे कमी केले आणि शिवराय आजारी पडले.

शिवरायांनी जितके शारीरिक कष्ट केले जितके त्रास सहन केले, तितकेच अनेकदा मानसिक त्रासातुनही शिवराय गेले आहेत. सईबाईंचे अचानक झालेले निधन, आप्तस्वकीयांची महाराजांबद्दल चालू असलेली कारस्थाने, रोजच्या दगदगीने होणारा मानसिक थकवा, मासाहेबांच्या जाण्याने डोक्यावरील गेलेले मायेचे छत, अनेक साथीदारांनी गमाविलेले प्राण, शंभूराजांबद्दल ऐकिवात आलेले अनेक हेवेदावे, या सगळ्या गोष्टींचा मानसिक त्रासदेखील शिवरायांचे खच्चीकरण करीत होता.

आणि त्या दिवशी शिवसूर्य मावळला:
शंभूराजे पन्हाळगडावर होते, इकडे रायगडावर राजाराम राजे स्वराज्याचे छत्रपती व्हावे अशी इच्छा सोयराबाईंच्या मनात होती. अनेक मंत्री त्यांच्या मनसुब्याला पाठिंबा देत होते, अशातच औरंगझेब आता दक्षिणेत मोहीम काढेल व स्वराज्यावर चालून येईल अशी लक्षणे दिसु लागली. शिवरायांनी ताबडतोब हालचालींना वेग आणला आणि अनेकांना वेगवेगळ्या कामगिरीवर धाडले. धाकट्या राजाराम राजांचे लगीन मोठ्या थाटामाटात लावून दिले, आणि मग मात्र काही कालावधीने शिवरायांना अशक्त वाटू लागले. एका सकाळी पाहतात तर अंगात जराही त्राण म्हणून उरला नव्हता आणि वैद्यांनी विषमज्वराचे निदान केले.

शिवरायांना अनेक औषधांच्या मात्रा दिल्या जात होत्या, परंतु ज्वर कमी होत नव्हता. सारा गड हिरमुसून गेला, गडावरील कामे मंदावली, गडावरील सुरक्षा, पहारे कडक झाले आणि दिवसागणिक विषमज्वराचा विळखा देखील घट्ट होत गेला. शिवरायांना, शंभुराजांना भेटण्याची ओढ लागली होती, परंतु गडावरून साधा संदेशही शंभुराजांना दिला जात नव्हता. दिवसामागून दिवस जात होते आणि शिवरायांचा ज्वर आणखीनच वाढत होता. शिवराय ज्वराने फणफणुन १० – ११ दिवस लोटले होते, आणि एके दिवशी राजे आपल्या कक्षात झोपून होते, डोळ्यांसमोर अंधारी येत चालली होती, अंगाला कोणाचाही होणारा स्पर्श त्यांना जाणवत नव्हता, आपल्या जुन्या आठवणी ते पुटपुटत होते, सारी मंडळी राजांभोवती गोळा झाली होती. शिवरायांना आपली वेळ आली हे कळून चुकले, आणि या साऱ्या महाराष्ट्राला पोरका करून आपला शिवबा राजा अनंतात विलीन झाला.

Great Chhatrapati Shivaji Maharaj Biography in Marathi :

सभासद बखरीत लिहिले आहे,

“शालिवाहन शके १६०२, रौद्र नाम संवत्सरे, चैत्र शुद्ध १५, रविवार दोन प्रहरी काल रायगडी जाला.”

०३ एप्रिल १६८०, कधीही न विसरली जाणारी तारीख. सूर्योदय व सूर्यास्त रोजच होत असतो परंतु त्या दिवशी… सूर्यास्त दोन झाले! एक सूर्य अस्त झाला तो सकाळी पुन्हा आला पण एक सूर्य जो अस्त झाला तो पुन्हा उगविलाच नाही. शिवराय गेले, अनंतात विलीन झाले, परंतु तरीही ‘शिवाजी’ संपत नसतो. शरीर हे सर्वांचेच नश्वर असते, परंतु त्याही पलीकडे जाऊन आपल्या कार्याने शिवराय इतिहासाच्या पानांवर, शेकडो मनांवर जिवंत राहिलेत.

आजही लहान मुलांच्या गोष्टीत शिवराय जिवंत आहेत, जय भवानी जय शिवाजी म्हणताच अंगावर येणाऱ्या शहाऱ्यावर शिवराय जिवंत आहेत, छत्रपती शिवाजी महाराज कि.. असे म्हणताच लहानमोठ्यांच्या तोंडून येणाऱ्या “जय” मध्ये शिवराय जिवंत आहेत, प्रत्येकाच्या विचारांत शिवराय जिवंत आहेत… अहो शिवराय नष्ट होणेच मुळी अशक्य आहे. शिवरायांना नेताना खरंच मृत्यूलाही रडू आले असावे.

‘मरावे परी कीर्तीरूपे उरावे’ हे वाक्य शिवरायांनी सार्थ केले. शिवरायांनी प्रत्येकाला जगायला शिकविले, आपल्या ध्येयासाठी वेडे होणे शिकविले, स्वाभिमानाने जगणे, माणसांना जोडण्याचे महत्व, माणसे ओळखण्याचे महत्व, दूरद्रीष्टी, राजकारण, समाजकारण आणि अशा अगणित गोष्टी शिवरायांनी आपल्याला शिकविल्या. स्वतःचे आयुष्य समकालीन लोकांसाठी व येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी शिवरायांनी आदर्श केले. शिवराय तर अनंतात विलीन झाले, परंतु आजही अनेकजण स्वतःच्या स्वार्थासाठी शिवरायांचा वापर करतात. केवळ स्वार्थासाठी बिनबुडाच्या वावड्या उठवितात, आणि ज्या शिवरायांनी स्वराज्याच्या नावाने जनसामान्यांना एकत्र केले त्याच शिवरायांच्या नावाने आज समाजात फूट पाडली जाते.

कदाचित त्यांना स्वार्थापलीकडे शिवराय समजतील इतकी त्यांची कुवत नसावी, परंतु, हे काम आपले आहे. आपण एक होऊन शिवरायांचे, शिवकार्याचे, शिवबलिदानाचे पावित्र्य जपले पाहिजे, आणि शिवरायांच्या नावावरून समाजात फूट पाडणाऱ्या नाठाळांच्या माथी सणसणीत काठी हाणली पाहिजे व आपले शिवराय खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना समजतील अशा पद्धतीने पोहोचविले पाहिजेत. आपल्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना याहून दुसरी उत्तम आदरांजली काय असावी

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Story Title: Truth of Chhatrapati Shivaji Maharaj Death in Marathi.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x