Chhatrapati Sambhaji Maharaj and Gudi Padwa | छत्रपती संभाजी महाराज आणि गुढीपाडवा | समज, गैरसमज
गुढीपाडवा आला कि संभाजी महाराजांचा मृत्यू आणि गुढीपाडव्याचा संबंध लावणारे मेसेज WhatsApp वर फिरायला लागतात. पण संभाजी महाराजांच्या मृत्यूचा आणि गुढी पाडव्याचा खरंच काही संबंध आहे का ? याबद्दल संपूर्ण पडताळणी करून आम्ही तुमच्यासाठी हा लेख घेऊन आलो आहोत.
छत्रपती संभाजी महाराज आणि गुढीपाडवा, समज-गैरसमज, Chhatrapati Sambhaji Maharaj and Gudi Padwa connection in Marathi :
गुढी पाडवा आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूचा संबंध लावणारे अनेक बनेल आणि बिनबुडाचे संदेश गुढीपाडवा येण्याच्या बरोबर काही दिवस आधी तुमच्या फेसबुक, व्हाट्सअँप आणि अनेक प्रसार माध्यमातून झळकतात आणि आपण अशाच कोणत्याही माहितीला खरी समजून विश्वास ठेवतो आणि मग पुन्हा तुमचा समाज विरुद्ध आमचा समाज अशी निर्लज्ज घोषणा देऊन वाट्टेल तसे वागतो, आणि ज्यांनी आपल्याला एकत्र आणले, एकत्र राहावं म्हणून आपले प्राण दिले त्याच शिवराय व शंभूराजांच्या नावाने एकमेकात फूट पाडून बसतो, शिव – शंभू नावाचा वापर करून स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजून घेतो.
महात्मा जोतीराव फुले म्हणाले होते ना “इतके अनर्थ एका अविद्येने केले” हे वाक्य आपण अशा वेळी अगदी तंतोतंत खरे करूनच दाखवतो. जराही शहानिशा न करता, डोकं न चालवता, खऱ्या – खोट्याची पडताळणी आणि त्या संदेशाची साधने विचारात न घेता आपण सहज अज्ञानी बनून विश्वास ठेवतो. जर समाजकंटक अशा माध्यमांचा वापर येणाऱ्या पिढ्यांची माथी भडकविण्यासाठी करीत आहेत तर आपल्यासारख्या सज्जन लोकांनी याच माध्यमांचा वापर ती भडकलेली माथी आणि ते समाजकंटक ताळ्यावर आणण्यासाठी करायला हवा ना! मग आज पडदा उठवूया शंभूराजांचा मृत्यू आणि गुढीपाडवा या बनेल नाटकावरून आणि जाणून घेऊया काय आहे या मागचे सत्य.
आरोप:
गुढीपाडवा हा कसा ब्राह्मणांचा सण आहे आणि शंभुराजांना मारून हा साजरा केला गेला हे दाखविण्यासाठी काही आरोप केले जातात. सर्वप्रथम केला जाणारा आरोप म्हणजे संभाजी महाराजांना औरंगजेबाने नव्हे तर ब्राह्मणांनी ठार केले, ब्राह्मणांनी मनुस्मृतीनुसार शंभुराजांना ठार केले, वर तुम्हाला हे सांगितले जाईल कि मनुस्मृती, अध्याय आठवा, श्लोक १२५/१२६ या नुसार शंभुराजांना मारले. पुढे सांगतात कि, शंभुराजांना मारून त्यांचे मुंडके कापून ते मनुस्मृतीमधील श्लोकानुसार काठीवर लटकवले आणि मिरवले आणि त्याचे प्रतीक म्हणून आपण आपला कलश उलटा ठेवतो.
असे देखील आरोप होतात कि, ब्राह्मणांच्यानुसार शंभूराजे हे मराठा बहुजनांचे राजे होते आणि त्यामुळे रागाने त्यांची हत्या ब्राह्मणांनी केली.
पडताळणी:
पहिला आरोप आपण पहिला कि ब्राह्मणांनी मनुस्मृती, आठवा अध्याय, श्लोक १२५/१२६ नुसार शंभुराजांना ठार केले. हे सांगताना मात्र तुम्हाला तो श्लोक दाखविला आणि समजाविला नसेल. आपण इथे तो श्लोक पाहूया. मनुस्मृती, अध्याय आठवा यात राजाने न्यायदान कसे करावे आणि त्यातील प्रकार, शिक्षा, दंड वगैरे गोष्टींची चर्चा केली आहे.
या आठव्या अध्यायातील १२५ व १२६ या श्लोकांच्या आधीची पार्श्वभूमी अशी कि एखाद्या कैद्याने किंवा साक्षीदाराने खोटी साक्ष, वासनेपोटी, भीतीने, लोभाने, अस्वस्थ होऊन, अज्ञानाने, रागाने दिल्यास त्याला दंड होईल व बहिष्कृत केले जाईल. ब्राह्मणांना फक्त बहिष्कृत केले जाईल पण इतर जातीच्या लोकांना शिक्षा दिली जाईल.
श्लोक १२५ व १२६ सांगतो कि हि शिक्षा देण्याच्या जागा आहेत, त्या जागा आहेत पोट, जिव्हा, हात, पाय, डोळा, कान व सगळं शरीर (१२५). राजाने गुन्ह्याचे गांभीर्य, काळ, वेळ, उद्देश, जागा अशा गोष्टी लक्षात घेऊन शिक्षेचे स्वरूप व अवयव ठरवावे (१२६). आता सांगा यात कुठे लिहिले आहे मुंडके ? आणि त्याला काठीवर लटकावणे ? आणि शिक्षा हि राजाने करायची असते, मग तेव्हा कोणता ब्राह्मण राजा होता ज्याने शंभुराजांना पकडले आणि मारले ? औरंगजेब आपले इस्लामी धर्मगुरू सोडून ब्राह्मणांनी सांगितल्यानुसार का वागेल ?
पहिला व दुसरा आरोप तर आपण साफ केला, आता तिसरा बघूया. शंभूराजे हे मराठा बहुजनांचे राजे या रागाने हत्या झाली. शंभूराजे हे मराठा बहुजनांचे राजे होते असे स्वतः त्यांनी कुठेही म्हटले नाही. शंभूराजांच्या स्वराज्यात काय फक्त मराठा व बहुजन राहत होते ? जर हे बहुजनांचे राजे आहेत तर शिवाजी राजांचा व शंभूराजांचा राज्याभिषेक ब्राह्मणांनी (पंडितांनी) का केला ? अष्टप्रधान मंडळ व सैन्यात ब्राह्मण का होते ?
शंभूराजांचे सोबती कवी कलश हे तर ब्राह्मण होते आणि मनुस्म्रीतीनुसार ब्राह्मणांना या शिक्षा होऊ शकत नाहीत, त्यांच्यावर फक्त बहिष्कार करता येऊ शकतो, मग ज्या मनुस्मृतीचे नियम सर्वस्व मानून शंभुराजांना मारले तेच नियम तोडून ब्राह्मणांनी एका ब्राह्मणालाच कसे मारले तेही अगदी शंभूराजांसारखे आणि त्यांच्या आधी ?
Chhatrapati Sambhaji Maharaj Death and Gudipadwa History Fact :
पुरवणी:
या सगळ्या भंपक गोष्टींना दुजोरा देण्यासाठी असे सांगितले जाते की गुढीपाडवा हा सण नव्हताच. हा सण ब्राह्मणांचा आहे आणि तो सुद्धा शंभुराजांना मारल्याच्या दिवसापासून सुरु झाला. आता अशा गोष्टींवर सुद्धा आपण सहज विश्वास ठेवतो, पण त्याआधी आपण काही गोष्टींकडे लक्ष देऊया. गुढी पाडवा या सणाचा उल्लेख आपल्याला शंभू मृत्यू, शिव जन्म आणि याही आधीच्या काळात सापडतो. याची काही उदाहरणे आपण पाहूया. २४ नोव्हेंबर १६४९ सालचे स्वराज्यातील एक पत्र आहे, या पत्रात एक महजर लिहिला आहे, त्यात गुढी पाडवा या सणाचा स्पष्ट उल्लेख केला आहे.
म्हणजेच शिवराय असताना देखील गुढी पाडवा साजरा केला जात होता. इतिहासाचार्य वि.के.राजवाडे यांनी “मराठ्यांच्या इतिहासाची साधने” या नावाने इतिहासाचे अनेक खंड प्रसिद्ध केले, आणि त्यात देखील अनेक पत्र वगैरे संग्रहित आहेत. त्यातील एका पत्रात गुढी पाडवा या सणाचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. या सोबतच एका पत्रात असा उल्लेख आहे कि गुढी पाडवा या सणानिमित्त निराजी पंडित आपल्या घरी आले होते. हे पत्र नारायण शेणवी या मुंबईच्या वकिलाने मुंबईच्या गव्हर्नरला लिहिले आहे.
हे निराजी पंडित म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक सदस्य होते आणि ते आपल्या घरी गुढी पाडव्यानिमित्त आल्याचा उल्लेख सापडतो. हे तर आपण पहिले कि शिवरायांच्या काळात गुढी पाडवा साजरा केला जात असे. आता पाहूया कि शिवरायांच्या आधीच्या काळात हा सण होता कि नाही. आपल्या संतांनी देखील गुढी पाडव्याचा उल्लेख अनेक कविता, अभंग इत्यादींमधून केला आहे. “टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची” हे संत चोखामेळा यांचे पद्य, त्या काळात गुढी पाडवा साजरा होत होता हे दर्शवते.
त्याही आधी संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय ४/६/१४ मधील ओळींत आणि अनेक ठिकाणी ‘विजयाची गुढी’ व असे अनेक गुढी पाडव्याचे उल्लेख, गुढी पाडवा हा सण त्याही काळात होता याचे पुरावे देतात. आपल्या खात्रीसाठी आपण त्यातील एक श्लोक पाहू,
एकें संन्यासी तोचि योगी। ऐसी एकवाक्यतेची जगीं। गुढी उभविली अनेगीं। शास्त्रांतरीं।।
संत एकनाथ महाराजांच्या भागवत ग्रंथात देखील अनेकवेळा गुढी पाडवा या सणाचा उल्लेख आलेला आहे. एकनाथ महाराज भक्तीची, आनंदाची, यशाची, रामराज्याची, निजधर्माची गुढी उभारावी असे सांगतात.
संत तुकाराम देखील आपल्या अभंगात म्हणतात,
पुढे पाठविले गोविंदे गोपाळा। चपळा हाती गुढी।।
यावरून तुकाराम महाराजांना देखील हा सण माहित होता आणि तो साजराही केला जात असे, असे सिद्ध होते.
काय आहे गुढी पाडवा ?
गुढी पाडवा हा आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र या पहिल्या मराठी महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. म्हणून या सणाला हिंदू नववर्ष असे देखील म्हणतात. हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे आणि या दिवशी सगळी नवीन आणि शुभ कार्ये केली जातात जी नक्कीच लाभदायक असतात. आपल्या दारात उभारलेली गुढी हि समृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून उभारली जाते. भारत, भारतातील अनेक संस्कृती तसेच भारताबाहेर म्हणजे आफ्रिका, इस्राईल, युरोप अशा देशांत अनेक धर्मातील पुराणांमध्ये काठी पूजेचा उल्लेख केला आहे, जी आपल्या हिंदू धर्मात गुढी पाडव्याला वापरतात, त्यामुळे काठी हि मनुस्मृतीमधून आली हे तर साफ भंपक आहे.
आपल्या पौराणिक कथांमध्ये सुद्धा एका राजाने, इंद्र देवाने दिलेल्या काठीची नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पूजा केली आणि त्याच्याप्रती आदर व्यक्त केला आणि मग पुढे अनेक राजांनी देखील काठीला वस्त्र लावून हि परंपरा पुढे नेली. आपल्या पुराणानुसार ब्रह्मदेव यांनी याच दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि पुढे याच दिवशी प्रभू श्री राम देखील आपल्या राज्यात वनवास संपवून आले असे सांगितले जाते. हा गुढी पाडवा सण जसा महाराष्ट्रात मराठी माणूस साजरा करतो तसेच कानडी आणि तेलगू मंडळी देखील साजरा करतात. इतकेच नव्हे तर इतरही राज्यांत नवीन वर्ष वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या नावांनी साजरे होते.
जागे व्हा !
मंडळी, आपण आज बरेच आरोप पहिले आणि त्या आरोपांसोबतच खरी खोटी माहितीही पाहिली. यावरून “समझने वालों को इशारा काफी है” आपल्या शंभूराजांनी कधीही जातीचे राजकारण केले नाही, माणसामाणसांत जातीभेद केला नाही. इतिहास हा जातीच्या आधारे मांडूच शकला जाणार नाही. स्वराज्यासाठी कवी कलश हा ब्राह्मण देखील महत्वाचा होता आणि शिवा काशीद नावाचा न्हावी देखील महत्वाचा होता. आपल्या शिव-शंभू पितापुत्राने जात-पात विसरून आपल्याला एकत्र यायला शिकविलं, आपण एकत्र राहावं म्हणून शंभूराजांनी प्राण दिले, आणि आपण त्यांचे नाव घेऊन एकमेकांचे प्राण घेण्याच्या गोष्टी करतोय.
राजे आज असते तर खरंच म्हणाले असते कि याच साठी का केला होता अट्टाहास स्वराज्याचा ?
हे शिवरायांचं स्वराज्य आहे, हे आपलं राज्य आहे, या राज्यातील एकेक दगड आणि एकेक माणूस महत्वाचा आणि आपला आहे. शंभूराजे कोण्या एका जमातीचे राजे नाहीत कि कोणत्या ब्राह्मणांचे प्रतिपालक नाहीत. ते रयतेचे राजे आहेत, आणि रयतेत ब्राह्मणही आले आणि बहुजनही, म्हणजेच शंभूराजे आपले आहेत. शंभूराजे आपले तर आहेत पण प्रश्न हा आहे कि ते आपल्यात आहेत का ? असतील तर त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन पुढे चला, सर्वाना सोबत घ्या आणि आपल्यात नसतील तर त्यांना आपल्यामध्ये जागे करा.
शंभूराजांचा मृत्यू हा औरंगजेबाने केला हे सत्य आहे आणि ते पुराव्यांसोबत आहे. याला विरोध करून एकच खोटी गोष्ट हजारवेळा बोलून खरी होत नाही हे लोकांनी लक्षात ठेवावे. आपल्याला भडकावणारे, आपल्यात फूट पडणारे तर निर्लज्ज आहेत, स्वार्थी आहेत, परंतु, आपण सज्जन आहोत आणि जर दुर्जन खोटे बोलण्यासाठी इतकी मेहनत घेत असतील आणि शंभूराजांच्या नावाने समाजात फूट पडणार असतील तर आपल्यासारख्या सज्जनांनी शंभूराजांच्या नावाने अशी फूट पाडणाऱ्या लोकांना चपराक देण्यासाठी आणि सत्य समोर आणण्यासाठी याहून अधिक मेहनत घेतली पाहिजे.
शंभूराजे तर गेले, पण आपल्यावर जबाबदारी टाकून गेले, ती जबाबदारी आहे आपली एकी टिकवून ठेवण्याची. आपण नक्कीच सगळे भेद बाजूला सारून या शिवरायांच्या स्वराज्याचे सुराज्य घडवूया. या गुढी पाडव्याला आपण अशा अफवांना बाजूला सारत प्रत्येकापर्यंत हे सत्य पोहचवले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने नव्या वर्षात शुभ कार्य घडले असे समाधान वाटेल. आपणा सर्वांना गुढी पाडाव्याच्या व हिंदू नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि शंभूराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Story Title: Chhatrapati Sambhaji Maharaj and Gudi Padwa connection in Marathi.
संबंधित कथा
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH