बालपण वाचवण्यासाठी!
बालपण म्हटलं की बर्याच अविस्मरणीय गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. परंतु ज्या मुलांचे लहानपणी लैंगिक शोषण झाले आहे, त्यांना बालपणीच्या आठवणी नकोश्या वाटतात. त्याचा परिणाम त्यांच्या मनावर फार खोलवर झालेला असतो. काही लोकांची धारणा आहे की विभक्त कुटुंबामुळे आई वडील कामावर जात असल्यामुळे, मुलांकडे लक्ष द्यायला कोणी नसल्यामुळे अशा घटना घडतात. विभक्त कुटुंबामुळेच शोषण करण्यास संधी मिळते, तसं काहीच नाही. एकत्रित कुटुंबात देखील अश्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. पण सामाजिक दबावामुळे त्या दाबल्या जातात व त्यांच्या उल्लेख ही होत नाही. यात शोषण करणारा हा नेहमी जवळचा व्यक्ती असतो.
काही वर्षांपूर्वीची एक घटना. एका सात वर्षांच्या मुलीला तिच्या काकांनी नशेचं औषध देऊन बेशुद्ध करून अतिप्रसंग केला. नाजूक परिस्थित जीव वाचला तरी अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. पोलिसांकडे तक्रार केल्यावर त्यांचं सर्वसामान्य म्हणणं असतं की आईला लक्ष देता येत नाही का? पण एकाच ठिकाणी राहत असताना आपल्या कुटुंबाच्या एखाद्याच्या सवयी, आईच्या लक्ष्यात येऊ नये किंवा येऊनही तिने बोलायची हिम्मत करू नये यावरून तिच्यावर असलेला कौटुंबिक दबाव लक्ष्यात येतो. काही वेळा घरच्या महिलांच्या लक्ष्यात असं वागणं येऊनही त्या तक्रारी करत नाहीत. जेव्हा एकदम बलात्कारासारखी घटना घडते तेव्हा या गोष्टी समोर येतात.
दुसरं उदाहरण – एका 7-8 वर्षाच्या मुलीचे आईवडील कामावर जायचे. मुलगी सकाळची शाळा आटपल्यानन्तर म्हाताऱ्या आजोबा जवळ राहायची. आजोबा तिला पाय दाबायला लावत असत. पण पाय दाबता दाबता ते तिला आपल्या गुप्तंगांवरही तेल लावून चोळायला लावायचे. शेजारच्या बाईंना हे दिसून पडल्यावर तिने तिच्या आईच्या लक्षात आणून दिले. पण ती बाई आज ही त्या मुलीला आजोबाच्याच भरोशावर सोडून कामावर जाते.खरं तर काही वेळा वारंवार अश्या घटना होऊ लागल्या तर मुलांनाही तो स्पर्श हवाहवासा वाटू लागला. तर ती तक्रार करणं बंद करतात किंवा करत नाहीत. तिसरं उदाहरण – 8- 10 वर्षाचा एक मुलगा, त्याच्याच सोसायटीत राहणाऱ्या एका 5 वर्षाच्या मुलाला आडोश्यात घेऊन जाऊन त्याचे गुप्तांग त्याला तोंडात घ्यायला सांगतो. त्या छोट्या मुलाने त्याच्या वडिलांकडे तक्रार केल्यावर ते सन्न झालेत.
आईच्या लक्ष्यात असूनही त्या बरेचदा भूमिका घेतली नाही.बलात्कार याचा शब्दशः अर्थ मुलांना पालक नेहमी जवळचे आणि महत्वाचे वाटतात. त्यामुळे मदतीसाठी मुलं नेहमी पालकांकडे बघतात. मुलांचे सर्वात जास्त जपवणूक पालकच करतात व ते मुलांच्या सुरक्षिततेला घेऊन दक्ष ही असतात. त्यासाठी मुलांना योग्य उपाय समजावून सांगणे गरजेचे आहे. मुलांची स्वप्रतिम संरक्षणात सर्वात महत्वाची असते. पालकांनी नेहमीच मुलांना जाणीव करून दिली पाहिजे की त्यांना ती फार आवडतात. मुलांना जेव्हा पालकांशी बोलावसं वाटतं, तेव्हा त्यांना वेळ द्यावा. मुलाने सांगितलेल्या गोष्टींच्या खरेपणा विषयी शंका वाटली तरी मुलांवर विश्वास ठेवायला हवा. मुलांशी बाल लैंगिक शोषणावर बोलणे पालकांची परीक्षा घेणारे ठरू शकतं. परंतु बोलणं टाळण्याने होणारे दुष्परिणाम अधिक गंभीर व भयावह होऊ शकतात. कदाचित तुमची मुलं शोषणाची बळी पडली असतील तरी त्यांना मदतीसाठी कुठे जावे हे ठाऊक नसेल.
बाल लैंगिक शोषणाचा अर्थ वयाने व शक्तीने अधिक असणाऱ्या व्यक्तीने लहान किंवा कमकुवत मुलांशी लैंगिक इच्छा पूर्तीसाठी केलेले वर्तन होय. यात शोषणकर्ता हा वयस्कर, प्रौढ किंवा वयात आलेला व्यक्ती असू शकतो पण शोषणाचा बळी मात्र नेहमी मुलंच असतात. यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शोषण करणारी व्यक्ती बहुतांश प्रकरणात परिचयाची असते. अश्लील चित्रे दाखवणे किंवा खाजगी अवयवांना स्पर्श करणे या गोष्टींचा वापर करून मुलांमध्ये लैंगिक भावना किंवा आकर्षणाचा निर्माण करणे असे अनेक प्रकारचे वर्तन शोषण ठरू शकते. बाल हक्कांसाठी काम करणाऱ्या काही संस्थांच्या मते दर 10 पैकी 6 मुली व 10 पैकी 4 मुलं लैंगिक अत्याचाराची बळी ठरतात. सर्वसाधारणपणे भारतात 53.3 मुलं लैंगिक अत्याचाराची बळी ठरतात.
सध्या इंटरनेट मुळे पोर्नोग्राफी सगळीकडे सहज उपलब्ध आहे. सर्व वेबसाईट्सच्या 17 टक्के पोर्न साईटस आहेत आणि सर्च इंजिनवर घुमूनफिरून येणारे 25 टक्के पॉपअप्स- लिंक्स पोर्न साईट्सवर घेऊन जातात. त्यामुळे कोणतेही प्रयत्न करता अलगद मुलं याच्या जाळ्यात ओढले जातात. मुलं त्यांच्या प्रोजेक्टचा साहित्य शोधताना सहज लिंक्स-पॉप अप वर क्लिक करतात व पोर्नोग्राफीच्या संपर्कात येतात. ज्यांचे पालक मुलांना बाहेर खेळायला जाऊ देत नाहीत व त्यांना गुंतवून ही ठेवत नाही आणि विरंगुळा किंवा टाइमपास म्हणून त्याला इंटरनेट चालू असलेलं मोबाइल यूट्यूब, गेम्स किंवा चित्रपट कार्टून पाहायला देतात त्यांची देखील मुलं कधीही अचानक पोर्नोग्राफी कडे कुतुहलाने वळू शकतात. आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना किंवा दुसर्यांना पोर्न दाखवण्यामागे तो दाखवण्यार्याचा उद्दीष्ट बघणार्याच्या मनात लैंगिक संबंधांसाठी उत्तेजन तयार करणे असतं. मुंबईच्या अंधेरीत कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्रात शिक्षक मुलींना दाखवून गैरवर्तन करत असे. काही प्रकरणांमध्ये सोबत पाहणारी मुलं आपसात संलैंगिक संबंध बनवतात. काही दिवसांपूर्वी डावोस येथे झालेल्या सममेलनात कैलाश सत्यार्थी यांनी कानपूरच्या अशाच एका घटनेचा उल्लेख केला ज्यात काही शाळकरी मुलं जमून आपल्या एका मित्राच्या घरी मोबाईलवर अश्लील चित्रफिती बघतात आणि काही वेळाने भावासकट सगळे घरी त्याच्या बहिणीचा बलात्कार करतात. देहारादून येथील एक उच्च भ्रू शाळेच्या गोदमात लपून पोर्न पाहणार्या मुलांना एका मुलीची नजर गेल्याचे लक्ष्यात आल्यावर मुलांनी तिच्यावर बलात्कार करून हत्या केली. काही प्रकरणं अशी देखील आहेत ज्यात वयात आलेली मतिमंद मुलं मोबाईलवर अश्लील चित्रफीत पाहत पालकांनी पकडली आहेत. वेगवेगळ्या सर्वेक्षणांत 7 ते 11 वयोगटातली सुमारे 55 -70 टक्के मुलं-मुली पोर्न साहित्याच्या संपर्कात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोर्न साहित्यापासून बालपण संरक्षणाचा आव्हान आजच्या पालकांवर आहे. मुलांच्या अपरिपक्वतेचा फायदा घेणार्या, त्यांच्या विकासाला हानी पोचवणार्या या लैंगिक व हिंसक साहित्याचे मुलांच्या मनोवैज्ञानिक विकासासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी बर्याच जोखीम आहेत.
भारतसह जगातील अनेक अनाथ आश्रमांमध्ये, आश्रमशाळा, वसतिगृहे, सर्व धर्माच्याधर्म स्थळांमध्ये आणि सर्वसामान्य शाळा ते मुंबईच्या अगदी लाखो रुपये फी घेणार्या पंच तारांकित आंतराष्ट्रीय महणवणार्या शाळांपर्यन्त मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना अनेकवेळा प्रकाशात आल्या आहे. कॅथॉलिक पुजारी, नन आणि धार्मिक अधिकार्यांकडून लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना 20 व 21व्या शतकात प्रकाशात येऊ लागल्या. कॅनडा, अमेरिका, लॅटिन अमेरिका,युरोप, आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया ह्या सर्व खंडांतुन अश्या हजारो घटना पुढे आल्या. वर्ष 2004 सालच्या जॉन जे क्रिमिनल जस्टीस कॉलेजच्या देशव्यापी सर्वेक्षणात 4,392 ख्रिस्ती पुजार्यांची ओळख करण्यात आली ज्यांनी 1950 ते 2002 च्या दरम्यान 10,667 मुलांचे लैंगिक शोषण केले. त्यावेळी एकूण 1,10,000 ख्रिस्ती पुजारी काम करत होते आणि त्यांच्या आरोपी असलेल्या पूजर्यांचा प्रमाण त्याच्या 4 टक्के एवढा होता. या रिपोर्टप्रमाणे समलैंगिक संबंध बनवण्यात आलेले 90 टक्के हे मुलं होते. लैंगिक शोषणाचा शिकार झालेल्या बालकांची खरी संख्या त्याहून कैक पटीने जास्त असलं तरी हा टक्का समाजात आढळणार्या सर्वसामान्य टक्केवारी इतकाच आहे. ह्या प्रकरणात नाव आलेल्या अनेक लोकांना वाचवण्याचे प्रयत्न वेळोवेळी चर्च कडून करण्यात आले. आयर्लंड देशात जाहीर करण्यात आलेल्या एका अहवालात स्पष्ट म्हटले आहे की चर्चला लैंगिक शोषणाची माहिती होती व अधिकार्यांच्या मदतीने प्रकरणे दाबण्यात यायची. 13 मे 2017 रोजी पोप फ्रांसिस यांनी कबुली दिली की स्वतः वेटिकन कडे अशी 2000 प्रकरण प्रलंबित आहेत. यासाठी चर्चच्या वतीने वेळोवेळी पॉप जॉन पॉल द्वितीय (2001),बेनेडीक्ट 16वे, आणि पॉप फ्रांसिस (2018) यांनी माफी मागितली.
वर्ष 2001 ते 2010 या एका दशकात 3000 ख्रिस्ती पुजार्यांची नावं समोर आली. सप्टेंबर 2018 मध्ये जर्मन कॅथॉलिक चर्च कडे 1947 ते 2014 च्या दरम्यान करण्यात आलेल्या 3677 बाल लैंगिक शोषणाच्या तक्रारी आल्या. चर्चच्या पुरुषसत्ताक व्यवस्थेत नन्स असल्या की हा प्रश्न सुटेल असा ही नाही. इटली देशाच्या वेल्लानो इथे 1996 साली लहान वयात दाखल झालेल्या मुलींचे आणि मुलांचे नन्स कडून लैंगिक शोषण करण्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या होत्या. वर्ष 2018च्या शेवटच्या 4 महिन्यात रोमन कॅथॉलिक चर्च कडून मागच्या अनेक वर्षांपासून बाल लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या 1000 पुजार्यांची यादी जाहीर करण्यात आली. वर्ष 2018च्या ऑगस्ट महिन्यात 1000 मुलांच्या शोषणात 300 पूजर्यांवर पेन्सिल्वेनिया इथे खटले दाखल झाले. 1995 पासून आजवर 100च्यावर पूजर्यांना या प्रकरणात ऑस्ट्रेलियात शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिथल्या पंतधांनांनी 2017 साली अश्या 60 हजार घटना पाहता ही ‘राष्ट्रीय शोकांतिका’ असे जाहीर केले. भारतात केरळ येथे थईकट्टूसेरीच्या (त्रिशूर) सेन पॉल चर्चच्या राजू कोक्कन या ख्रिस्ती पूजर्या विरुद्ध बाल लैंगिक शोषणाची घटना गाजली होती. अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया या सर्व खंडात एक गोष्ट सर्वसामान्य पणे दिसून आली ती म्हणजे लैंगिक अत्याचाराचे बळी पडलेले 78 टक्के मुलं आहेत व 22 टक्के मुली आहेत.
अमेरिकन वृत्तपत्र ‘बोस्टन ग्लोब’च्या वतीने वर्ष 2002 साली त्यांच्या ‘स्पॉटलाइट’ टीम कडून चर्चकडून बालपाणी लैंगिक बलात्काराच्या बळी पडलेल्या 130 लोकांच्या कहाण्या प्रकाशित करण्यात आल्या. लहान मुलांच्या बलात्कार्यांमागे ज्या पद्धतीने चर्च उभी होती त्याचे धक्कादायक खुलासे झाल्याने संपूर्ण अमेरिका हादरून गेली. त्यानंतर अश्या हजारो कहाण्या बाहेर पडू लागल्या आणि फौजदारी खटले दाखल करण्यात आले. बोस्टन ग्लोबच्या निर्भीड पत्रकारितेमुळे कॅथॉलिक शाळांच्या प्रवेशात सुमारे 66 टक्यांची कमतरता आली. इतके दूरगामी व नकारात्मक परिणाम चर्च वर पहिल्यांदा झाले. बहुतांश प्रकरणात ख्रिस्ती धर्मगुरू मुलांना ते प्रभू ख्रिस्ताचा अवतार आहेत आणि शारीरिक संबंधांतुन येशू प्रसन्न होऊन त्यांच्या जवळ जाता येईल असं सांगितलं जायचं. कालांतराने या निर्भीड पत्रकारितेला पुलित्जर पुरस्कार मिळाला पुढे यावर 2015 साली ‘स्पॉटलाईट’ नावाचा चित्रपट देखील निघाला ज्याला सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा ऑस्कर अवार्ड मिळालं. ह्या घटनांवर जागरूकता वाढली, लोकं न घाबरता आपल्या 50 व 60 च्या वयात देखील कबुली देऊ लागले तरी बाल लैंगिक शोषणाच्या घटना घडतच आहेत.
खूप छोटी मुलं असल्यावर अंगठा चुसणे, अंथरूण ओलं करणे, झोपेत त्याच लैंगिक अत्याचारची स्वप्न पडल्यावर अचानक किंचाळून जागे होणे, किंवा आयुष्यभर त्या आठवणींचा पाठलाग, शाळेत मन न लागणे आदि लक्षणे दिसून येऊ शकतात. ज्या बालकांचे खूप दिवस लैंगिक शोषण झाले आहे त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव, स्वतःला कुचकामी समजणे, लाजिरवाणे, वाईट संभोग व लैंगिक संबंधांबद्दलबद्दल असामान्य व विकृत समज असणे, मुलं एकलकोंडी होऊ शकतात किंवा आत्महत्येस देखील प्रवृत्त होऊ शकतात. काही सर्वेक्षणांमध्ये या मुलांचे पुन्हा इतरांकडून लैंगिक शोषण होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढून जाते. पीडितांशी त्यांच्या इच्छेविरुद्ध गैरवर्तन केले असल्याने ते स्वतःला असहाय व शक्तिहीन समजू शकतात. ज्याच्यावर विश्वास केलं त्यानेच विश्वासघात केळ्याचे अनुभव आल्याने ते संशयी बनतात आणि दुसर्यांवर विश्वास टाकत नाहीत. या मुलांचे आपल्या निकटवर्तीयांवर राग असू शकतं कारण त्यांनी वेळेवर त्याचा बचाव किंवा संरक्षण केला नाही.
थोड्या मोठ्या वयाच्या मुलांमध्ये जास्त मानसिक विकास झाल्याने नशेच्या आहारी जाणे, तणावात राहणे, आत्मविघातक वर्तन आढळू शकतं. लैंगिक शोषण करणार्या व्यक्तीशी शारीरिक व नाव साधर्म्य असल्यास तिच्याशी फटकून राहणे यासारखे वर्तन बदल दिसू शकतात. दीर्घकालीन परिणाम त्यांच्या लैंगिक जीवनावर देखील पडू शकतो ज्यात काही प्रकरणात एकूण शारीरिक संबंधांबद्द्ल अविश्वास किंवा अरुचि विकसित होते. लहानपणी लैंगिक अत्याचाराला बळी पडलेले पालक आपल्या मुलांना घेऊन अनेक वेळा अतिरक्षात्मक पद्धतीने वागतात.
बाल लैंगिक शोषण प्रामुख्याने 2 स्तरांवर हाताळला जातो. एक कायदा आणि दुसरा मुलाचा बचाव. दोन्ही पद्धतींचा जोर मुलाला लैंगिक अत्याचारापासून वाचवण्याऐवजी न्याय देण्यावर असतो. बाल लैंगिक शोषण थांबवण्यावर किंवा घटना घडल्याच्या जखमा कमी करण्यावर याचं जोर असतो. परंतु बहुतांश घटनांची माहिती उघड किंवा नोंदच होत नसल्याने या दोन्ही पद्धती निरुपयोगी ठरतात. ज्या मुलाचं लैंगिक शोषण झालं आहे तो गंभीर आणि दूरगामी मानसिक त्रासातून जात असतो. मानसिक आरोग्य सेवेचा दायऱ्यात शोषण करणारा आणि शोषित मुलाला आणलं गेलं पाहिजे. या प्रश्नावर पालक, शाळा व सरकार तिघांनी आपली जबाबदारी उचलली पाहिजे. बाल लैंगिक शोषण मुलांच मानसिक, सामाजिक आणि भावनिक नुकसान करतो. समाज म्हणून या गोष्टी थाम्बवायची सामूहिक जबाबदारी आपण सर्वांवर आहे. किशोरवयीन व प्रौढ मुलांना, त्यांच्या पालकांना व देखभाल करणाऱ्यांना याचं शिक्षण द्यावं लागेल की बाल लैंगिक शोषणाचा मुलांवर अत्यंत नकारात्मक परिणाम होतो. जर तशी काही घटना घडली तर त्यावेळी परिस्थिती कशी हातळावी. पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेत शिकण्याच्या वयातल्या मुलांना चांगलं आणि वाईट स्पर्शाची ओळख समजवणं गरजेचं आहे. ज्या मुलांसोबत असं काही घडलं असेल त्यांना त्या घटनेची वाच्यता पालक किंवा इतर जबाबदार व्यक्तीशी करण्याचा आत्मविश्वास त्याला देण्याची गरज आहे.
पालकांना त्यांच्या घरात सोशल मीडियावर काय बघितलं जातं त्यावर लक्ष्य ठेवणे आणि लहान वयापासून सुरक्षा आणि लैंगिकता या बद्दल शिकवणे ही कर्तव्य आहे हे समजून घेणे आता गरजेचे बनले आहे. मुलांच्या लैंगिक शोषणाविषयी त्यांच्याशी चर्चा करणे या विषयी सर्वांनाच गोंधळ आहे. तरीही गोंधळून न जाता आपल्या मुलांविषयी सुरक्षिततेचे नियम तयार करा. त्यासाठी उदाहरणार्थ मुलांना रास्ता ओलांडताना दोन्ही बाजूने बघून रास्ता ओलांड, आगपेटीशी खेळू नकोस याच सोबत तुझ्या वैयक्तिक सुरक्षिततेसाठी कोणत्याही व्यक्तीने तुझ्या खाजगी अवयवांना हात लावणे अयोग्य व धोकादायक आहे अश्या रीतीने चर्चा करावी. या विषयावर चुप्पी तोडण्याचे त्वरित उपाय करणे गरजेचे आहेत. त्यामुळे पालकांनी नेहमी जवळच्या व्यक्तीपासून देखील सावध असणे गरजेचे आहे. यात जवळचे नातेवाईक व शेजाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे मुलांच्या वर्तणुकीत अचानक झालेले बदल पालकांना टिपता आले पाहिजे. औदासीन्यता, तणाव, स्वतःला तुटलेला समजणे, इतर मुलांसोबत खेल क्रीडा प्रकारात सहभागी न होणे, विचारमग्न राहणे, चिडचिड करणे, फसवणूक झाल्याची समज, शांत राहणे, लक्ष्य विचलित होणे या सारखी लक्षणे दिसून येतात. ही मुले लाज, अपराधिक भावना किंवा सम्भ्रमावस्थेत सुद्धा असू शकतात.
किशोरवयीन मुलांसाठी तज्ञ आणि मनोवैज्ञानिकांचे व्याख्यान पालकशास्त्र, शरीरातील अवयव, पुनरुत्पादन, गर्भधारणा आणि लैंगिक संक्रमित आजारांविषयी जागरूकता व शंका निरसन करण्याच्या दृष्टीने आयजित केले गेले पाहिजे. त्यांच्या चुका झाल्यास बदडून काढणे किंवा गळीच्छ असल्याची प्रतिक्रिया टाळून मुलं, पालक व शिक्षकांशी संवाद या कार्यक्रमात झालं पाहिजे. सोशल मीडियाद्वारे देशामध्ये प्रक्षेपित होणारी आक्षेपार्ह सामग्री अवरोधित करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. केंद्र किंवा राज्य सरकारांनी इंटरनेटवर सहजपणे पोर्नोग्राफीचा प्रवाह टाळण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु शाळेत,शिक्षकांना त्यांच्या मुलांना मुलींशी आदर व सन्मानाने वागणं शिकवण्याची गरज आहे. काही शाळा मुलांना ‘चांगल्या आणि वाईट स्पर्श’बद्दल जागरूक करीत आहेत. विद्यार्थ्यांमधील वर्तनात्मक बदल टिपण्याचे व ओळखण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे सत्र घेण्यात आले.
पहिली ते तिसरीच्या लहान मुलांमधील जागरूकता अधिक महत्वाचे आहे कारण या मुलांना स्नेही आणि अयोग्य स्पर्श यांच्यात फरक कळत नाही. स्कूल बस, स्वच्छतागृहांमध्ये अश्या घटना घडल्याचा बातम्या साधारणपणे आपण वाचत असतो. म्हणून शाळांनी पुरुष कर्मचाऱ्यांसह एकट्या मुलांना सोडू नये महिला कर्मचारी नेहमीच जवळपास असावी. ज्या शाळांकडे सीसीटीव्ही आहेत त्यांनी त्याचे फुटेज नियमितपणे तपासले जात असल्याची काळजी घ्यावी. या विषयाशी कसे वागावे यासाठी शिक्षक व शाळेच्या अधिका-यांनी त्यांना सल्ला दिला पाहिजे. पालकांना शक्य तितक्या लवकर आपल्या मुलांसह लैंगिकता आणि लैंगिकताविषयक समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी पालकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी कार्यशाळा आणि पीटीए मीटिंग चांगला मंच आहे पण दुर्दैवाने या मंचाचा गैरवापर दरवर्षी शाळा केवळ फी वाढ लादण्यासाठी करताना दिसतात. योजना आहेत. जर या समस्यांविषयी स्पष्टपणे आणि निःसंकोचपणे चर्चा केली गेली तर पालक मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि चांगल्या आणि वाईट स्पर्शाबद्दल शिकण्यास तयार असतील. दुर्व्यवहार आणि छळवणूकच्या घटनांची माहिती व तक्रार देण्यासाठी मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यात देखील मदत होईल.
तीन वर्षाच्या मुलाला हे समजून घेणे आवश्यक आहे की तिला स्पर्श करणारा कोणता स्पर्श खराब स्पर्श आहे. जसजसे ते मोठे होत जातात तसतसे शाळा त्या विषयाच्या जटिलतेवर शिक्षित करू शकते. पालक, मुले आणि शिक्षक यांच्यात खुले संप्रेषण माध्यमांची स्थापना करणे की ज्याने त्यांना सुरक्षित आणि सुरक्षित वाटेल आवश्यक आहे. अधिक गंभीरपणे, शिक्षक आणि कर्मचारी काळजीपूर्वक पार्श्वभूमी तपासणीनंतर कामावर घेतले पाहिजे आणि शाळांनी सर्व कर्मचार्यांविषयी तपशीलवार माहिती ठेवली पाहिजे. डॉक्युमेंट्री चित्रपट बनवणारे संजय सिंह यांनी ‘चुप्पी तोडो : गो टेल मॉम’ नावाचं चित्रपट बनवून मुलांना ओळखने (रिक्ग्नइज), प्रतिरोध (रेसिस्ट) आणि रिपोर्ट (तक्रार) करण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. बाल हक्क आयोग, महिला आणि मुलांवरील गुन्हेगारीसाठी नेमलेले पोलीस कर्मचारी असंवेदनशील आहेत अशी अनेक तक्रारी आहेत. महिला कर्मचार्यांना महिला आणि बाल सुरक्षा समस्यांबद्दल व कर्तव्याबद्दल जागरुक करण्यासाठी कार्यशाळेचे नियमित आयोजन करायला हवे. स्वयंसेवी संस्थांनी या मुद्यांवर पोलीस कर्मचारी व नागरिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करीत राहिले पाहिजे. मीडिया प्रचार अभियानांच्या माध्यमातून बाल लैंगिक शोषणाची माहिती मिळाल्यावर मुलांशी कसं वागावं, त्याची तक्रार कुठे व कोणत्या पद्धतीने करावी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी वगैरे जागृती शासनाकडून केली गेली पाहिजे. बाल लैंगिक अत्याचारांच्या तक्रारींच्या बाबतीत शाळांना अनुसरण्यासाठी प्रोटोकॉल तयार केले गेले पाहिजे. शिक्षण विभागाच्या पुढाकाराने शाळांमध्ये नियमितपणे मुलांसाठी, शिक्षक तसेच पालकांसाठी संवेदनशीलता कार्यशाळा आयोजित करायला हवी. बालकांचे लैंगिक शोषण ही घृणास्पद व भयावह गोष्ट आहे. बरेचदा असे होऊ शकते याची आपल्याला कल्पनाही नसते. अशा घटनांनी बालकासोबतच त्याचे पालक देखील खचून जातात. परंतु खचून जाण्यापेक्षा किंवा वास्तव्य नाकारण्यापेक्षा त्याविषयी अधिकाधिक जागरूकता बालक व पालकांमध्ये निर्माण करणे हेच आपल्यात हातात आहे.
कल्पना पांडे
[email protected]
9082574315
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो