सातारा : काल देशभरातील लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि देशभरात मोदी त्सुनामी आल्याचे दिसले. त्यात अनेकांनी या निकालावर आश्चर्य व्यक्त करत वेगळीच शंका व्यक्त केली होती. दरम्यान अनेकांनी देशात मोदी लाट नक्कीच नव्हती असं जाहीर पणे म्हटलं आणि अनेक भाजप नेत्यांनी देखील ते पडद्याआड मान्य केलं. विशेष म्हणजे मुस्लिम बहुबल भागात देखील भाजपच्या उमेदवारांना भरभरून मतं पडल्याने त्यात शंका अधिक दुणावल्याचे पाहायला मिळाले.
त्यात आता राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील संताप व्यक्त करत स्वतःचं मत व्यक्त केलं आहे. त्यात प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, देशात मोदी लाट अजिबात नव्हती आणि त्याउलट मोदी विरोधी लाट होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसहित, बेरोजगारी, आर्थिक उन्नती असे अनेक महत्वाचे प्रश्न असताना भारतीय जनता पक्षाला देशभरात बहुमत मिळणं ही न पटणारी गोष्ट आहे. जर सत्ताधाऱ्यांना ईव्हीएम’च्या माध्यमातून पुन्हा सत्ता हस्तगत करायची होती तर निवडणूक तरी कशाला घ्यायची होती, असे मत व्यक्त करत खासदार उदयराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला.
कालच्या निकालानंतर त्यांनी आज यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाला अभिवादन करून पत्रकार परिषद घेतली आणि स्वतःच मत व्यक्त केलं. पुढे ते म्हणाले की तब्बल ११ राज्यांमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळावी नाही आणि त्यांची एवढ्या मोठ्या प्रमाणावर पीछेहाट होते हे न पटणारं आहे. त्यामुळे माझी या निवडणूक प्रक्रियेवरच शंका आहे असं ते म्हणाले. अगदी प्रगत देशांमध्ये देखील बॅलेट पेपरचा वापर केला जातो, मात्र आपल्याकडे तीव्र विरोध असताना देखील ईव्हीएम’चा हट्ट केला जातो. आणि जर सत्ताधाऱ्यांना ईव्हीएम’च्या माध्यमातून पुन्हा सत्ता हस्तगत करायची होती तर निवडणूक तरी कशाला घ्यायची होती, असे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले.






























