18 November 2024 7:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

रोजगारावर भाजप किती खरं बोलतंय?, राज्यातील तरुणांनी रोजगारासंबंधित हे वास्तव समजून घेतल्यास शिंदे-फडणवीसांचा राजकीय खेळ समजेल

Former CM Thackeray

Former CM Uddhav Thackeray | फॉक्सकॉन गुजरातला गेल्याच खापर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवरती फोडत असले तरी तत्कालीक सरकारच्या काळात उद्योगासाठी वाटप केलेल्या भूखंडाना शिंदे सरकारनेच स्थगिती दिल्याने हजारो कोटींची गुंतवणूक ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. औद्योगिक विकास महामंडळाने विविध स्तरावरती वाटप केलेल्या भूखंडाला स्थगिती दिल्याने पुनर्वलोकनाच्या नावाखाली दीड महिन्यापासून हजारो कोटींची गुंतवणूक असलेले उद्योगांचे प्रस्ताव धूळखात पडून आहेत, त्यामुळे उद्योग विश्वात नाराजीचा सूर असून मुंबई, पुणे, ठाण्यासह विदर्भ मराठवाड्यातील 30 ते 40 हजार कोटींची गुंतवणूक आणि लाखो तरुणांना मिळू शकणारा रोजगार शिंदे सरकारच्या राजकीय द्वेषातील स्थगित्यांमुळे खोळंबला आहे.

फॉक्सकॉन गुजरातला गेल्याच्या आरोपांना प्रतिउत्तर देताना काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील महाविकास आघाडी सरकारने काहीच केलं नसल्याचा आरोप केला. त्यांच्या आरोप फॉक्सकॉनला धरून असला तरी फडणवीसांचा रोख हा नेहमी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काहीच न करता दोन वर्ष घरीच बसून होते अशाच राजकीय तोऱ्यात असतो. त्यासाठी संपूर्ण राज्यातील भाजप नेते आणि त्यासोबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट सुद्धा कोरोना काळातील परिस्थितीचा आधार घेतात. पण भाजप नेत्यांचे आणि शिंदे गटाचे आरोप खरे आहेत का? किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोनाकाळात दीड-दोन वर्ष काहीच करत नव्हते आणि त्यांनी भूमिपुत्रांना रोजगार मिळवा यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने काहीच काम केलं नाही यात किती तथ्य आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून समोर आलेल्या अधिकृत माहितीच्या आधारे भाजप नेते आणि शिंदे गट धांदात खोटं बोलत आहेत, असंच म्हणावं लागेल.

वास्तविक, कोरोनाकाळात भारत आणि महाराष्ट्रासह संपूर्ण जग हे जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीप्रमाणे सर्व प्रशासन चालत होतं. अगदी कोरोना काळातील अत्यंत बिकट असलेले पहिले 12-13 महिने सोडले तर वर्ल्ड बँक, आयएमएफ ते अगदी राज्य (MIDC) स्तरावरील प्रशासकीय यंत्रणा कोरोना नियमांचे पालन करत व्हर्च्युअली पुन्हा कामाला लागल्या होत्या. तत्कालीन मुखमंत्री उद्धव ठाकरे स्वतः देशभरातील उद्योजकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत असताना राज्यात गुंतवणूक कशी वाढेल आणि भूमिपुत्रांना अधिक रोजगार कसा मिळेल यासाठी सरसावले होते. मात्र मागील सरकारच्या दोन वर्षाच्या काळात काहीच झालं नसल्याचं सांगणारे विद्यमान मुख्यमंत्री कदाचित तेव्हा दोन वर्ष शिवसेना फोडण्याची मायक्रो योजना अंमलात आणण्यात व्यस्त असावेत म्हणून त्यांना मंत्री पदी असूनही नेमकं राज्यात काय सुरु आहे ते माहिती नसावं असं खालील पुरावे सांगत आहेत.

Uddhav-Thackeray-chaired-a-meeting-with-prominent-industrialist

आता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं सरकार कसं कामं करत होतं आणि किती उद्योग व रोजगार निर्माण करत होते समजून घ्या.

१. ६ ऑगस्ट रोजी २१०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून औषधनिर्मिती क्षेत्रात २५०० रोजगार निर्मिती करणाऱ्या दिंडोरीतील रिलायन्स लाइफ सायन्सेस सोबत राज्य सरकारने सामंजस्य करार (MoU) केला होता. त्यासंबंधित अधिकृत माहिती ‘एमआयडीसी इंडियाने ट्विट करून दिली होती.

२. इथेनॉलसाठी उमरेड, एमआयडीसी नागपूर येथे ३७० कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या बैद्यनाथ ग्रुपने राज्य सरकारसोबत १० ऑगस्ट २०२१ रोजी सामंजस्य करार (MoU) केला होता. राज्य सरकारच्या पुढाकाराने एमआयडीसीने विक्रमी वेळेत 45 एकर जमीन वाटप केले होते, कारण यामुळे 300 लोकांना रोजगार मिळणे अपेक्षित होते, विशेष म्हणजे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार होती आणि जीवाश्म इंधनावरील आपले अवलंबित्व कमी करण्यास यामुळे मदत होईल असे एमआयडीसी इंडियाने अधिकृत माहिती देताना म्हटले होते.

3. जेएसडब्ल्यूएनर्जीने संपूर्ण महाराष्ट्रात 35,000 कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी राज्य सरकारसोबत अधिकृत सामंजस्य करार (MoU) केला होता. त्यासंबंधित अधिकृत माहिती ‘महाराष्ट्र एमआयडीच्या सीईओंनी ट्विट करून दिली होती.

4. राज्य सरकार व एमआयडीसी इंडियाने 1 ऑक्टोबर 2021 रोजी कॉसिस ई-मोबिलिटीसह सामंजस्य करार केला होता. २८०० कोटींच्या या गुंतवणुकीसह तळेगाव येथील या ईव्हीजच्या कारखान्यामुळे १२५० रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच यामुळे वातावरणबदल नियंत्रण करण्यास मदत होईल. याबद्दल अधिकृत माहिती त्याच वेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली होती.

5. तसेच २० नोव्हेंबर २०२१ रोजी औद्योगिकीकरण आणि रोजगारांना चालना देण्यासाठी उद्योग विभागाने सुभाष देसाई आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत दुबईच्या एक्स्पो 2020 मध्ये 15,260 कोटी रुपये (2 अब्ज डॉलर्स) किंमतीच्या प्रमुख गुंतवणूकदारांशी 24 सामंजस्य करार केले होते. त्याची अधिकृत माहिती एमआयडीसी इंडियाने ट्विट करून दिली होती.

6. ७ डिसेंबर २०२१ रोजी मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या 8 व्या आवृत्तीत उद्योग विभागाने मुंबईत 5051 कोटी रुपयांच्या 12 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या, ज्यामुळे राज्यात 9000 हून अधिक रोजगार निर्मिती होईल. त्यावेळी तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई, एसीएस (आय) श्री बलदेव सिंह आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन आज उपस्थित होते. त्यासंबंधित अधिकृत माहिती ‘एमआयडीसी इंडियाने ट्विट करून दिली होती.

7. नवी मुंबईतील प्रस्तावित इंडिया ज्वेलरी पार्कसाठी १३,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी एमआयडीसीने जीजेईपीसीइंडियाबरोबर १९ जानेवारी २०२२ रोजी भाडेपट्ट्याने करार केला होता. जीजेईपीसी इंडियाच्या प्रतिनिधींनी राज्य सरकारच्या अखत्यारीतील एमआयडीसीच्या सीईओंसोबत दौराही केला होता. याबाबत अधिकृत माहिती प्रशासनाने दिली होती.

8. इंडोरामा व्हेंचरने महाराष्ट्र सरकारसोबत २३ मे २०२२ रोजी 600 कोटी रुपयांच्या सामंजस्य करार केला होता आणि ही नागपुरातील बुटीबोरी येथे गुंतवणूक करणार आहे, ज्यामुळे 1500 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

9. २३ मे २०२२ रोजी दावोस येथे स्वतः तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि राज्य एमआयडीसीचे सीईओ (IAS) यांच्या उपस्थितीत इंडोनेशियातील अग्रगण्य पल्प अँड पेपर कंपनी सिनर्मास एपीपीसोबत 10500 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होता. या गुंतवणुकीचा फायदा कोकण विभागातील रायगड जिल्ह्यात होणार आहे. त्यासंबंधित अधिकृत माहिती ‘एमआयडीसी इंडियाने ट्विट करून दिली होती.

10. २३ मे २०२२ रोजी मायक्रोसॉफ्ट इंडियाचे लीडर चारु श्रीनिवासन आणि महाराष्ट्र सरकारने डेटा सेंटरच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 3200 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या गुंतवणुकीतून राज्याला मोठा रोजगार देखील मिळणार आहे. त्यासंबंधित अधिकृत माहिती ‘एमआयडीसी इंडियाने ट्विट करून दिली होती.

11. तसेच २३ मे २०२२ रोजी जीआर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज स्टील क्षेत्रातील कंपनीने त्यांचा कंपनी विस्तार करण्यासाठी दावोस येथे महाराष्ट्र सरकारसोबत 740 कोटी रुपये किंमतीचा सामंजस्य करार केला होता. ही कंपनी नागपूरमध्ये गुंतवणूक करणार आहे आणि त्यातून 700 लोकांना रोजगार प्राप्त होणार आहे. त्यासंबंधित अधिकृत माहिती ‘एमआयडीसी इंडियाने ट्विट करून दिली होती.

12. त्यानंतर २३ मे २०२२ रोजी व्हॅलियंट ग्रुपने महाराष्ट्र सरकार सोबत दावोस येथे त्यांच्या बेडींग विभागाच्या विस्तारासाठी १५० कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव विभागात ३०० तरुणांना रोजगार निर्मिती होणार आहे. त्यासंबंधित अधिकृत माहिती ‘एमआयडीसी इंडियाने ट्विट करून दिली होती.

13. २३ मी २०२२ रोजी जपानच्या आघाडीच्या औद्योगिक उत्पादन कंपनीने महाराष्ट्र सरकारशी 30 कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला होता. ही कंपनी अहमदनगरमधील औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. त्यासंबंधित अधिकृत माहिती ‘एमआयडीसी इंडियाने ट्विट करून दिली होती.

14. रिलायबल हब्स ही सिंगापूरची कंपनी अंबरनाथ एमआयडीसी क्षेत्रात 170 रोजगार निर्मिती करणाऱ्या लॉजिस्टिक आणि वेअरहाऊसिंग पायाभूत सुविधांसाठी 48 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यासाठी २३ मे २०२२ रोजी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार केला होता. त्यासंबंधित अधिकृत माहिती ‘एमआयडीसी इंडियाने ट्विट करून दिली होती.

15. २३ मे २०२२ रोजी इंडोकाउंट मॅन्युफॅक्चरर ऑफ होम लिनन या एक्सपोर्टर कंपनीने अधिकृतपणे महाराष्ट्र सरकारसोबत 510 कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला असून यामुळे कोल्हापूर येथे 900 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यासंबंधित अधिकृत माहिती ‘एमआयडीसी इंडियाने ट्विट करून दिली होती.

16. २३ मी २०२२ रोजी हॅवमोर ग्रुप या आइस्क्रीम्स उत्पादक कंपनीने महाराष्ट्र सरकार सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. ही कंपनी 263 कोटी रुपयांची गुंतवणूक केली करणार असून त्यातून 180+ रोजगार निर्मिती होणार आहे. त्यासंबंधित अधिकृत माहिती ‘एमआयडीसी इंडियाने ट्विट करून दिली होती.

17. २३ मे २०२२ रोजी वेबीना वेरवेनच्या एमडी, श्वेता बाली यांच्या कंपनीने श्रीरामपूर येथे वेअर हाऊस आणि लॉजिस्टिक पार्क विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार केला होता. कंपनी 143.88 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यातून 3020 लोकांना रोजगार मिळणार आहे.

18. २३ मे २०२२ रोजी अल्प्रोज इंडस्ट्रीजचे सुशांत सुखीजा यांनी अमरावतीमध्ये 150 कोटी रुपयांची गुंतवणूक करून डेनिम फॅब्रिक्सच्या त्यांच्या नवीन प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार केला होता. या गुंतवणुकीची माहिती एमआयडीसी इंडियाने ट्विट करून दिली होती.

19. २३ मे २०२२ रोजी विश्वराज इन्व्हायर्मेंटचे अरुण लखानी यांनी एमआयडीसी चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली येथील इंधन इथेनॉल प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारसोबत 1000 कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला होता. या गुंतवणुकीची माहिती एमआयडीसी इंडियाने ट्विट करून दिली होती.

20. २३ मे २०२२ रोजी वेअरहाऊसिंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात अग्रेसर असलेल्या स्कॅलर ग्रुपच्या गोपाळ मोर यांच्यासोबत चाकण पुणे येथे कंपनी विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारशी 650 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसाठी सामंजस्य करार केला होता. त्यामुळे 1700+ रोजगार निर्मिती होणार आहे. या गुंतवणुकीची माहिती एमआयडीसी इंडियाने ट्विट करून दिली होती.

21. २३ मे २०२२ रोजी टाटा रिअल्टी या आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपरसोबत महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्रात विस्तार करण्यासाठी दावोस येथे 5000 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. या गुंतवणुकीची माहिती एमआयडीसी इंडियाने ट्विट करून दिली होती.

22. २३ मे २०२२ रोजी सोनई ईटेबल या भारतीय अन्न प्रक्रिया कंपनीने महाराष्ट्र सरकारबरोबर 200 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या आणि ही कंपनी इंदापूर एमआयडीसीमध्ये गुंतवणूक करणार असून त्यामुळे 400 तरुणांना रोजगार मिळणार आहे. या गुंतवणुकीची माहिती एमआयडीसी इंडियाने ट्विट करून दिली होती.

23. २३ मे २०२२ रोजी गोयल प्रोटीन्स ही कंपनी सोयाबीन उत्पादनांच्या उत्पादनासाठी नागपुरातील त्यांच्या नवीन अति-आधुनिक प्रकल्पासाठी 380 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. त्यामुळे स्थानिकांना मोठा रोजगार प्राप्त होणार आहे. या गुंतवणुकीची माहिती एमआयडीसी इंडियाने ट्विट करून दिली होती.

24. २३ मे २०२२ रोजी आघाडीची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी पीजी टेक्नोपलास्टच्या विशाल गुप्ता यांनी 315 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार केला होता. त्यामुळे 1500 तरुणांना रोजगार मिळणार आहे. या गुंतवणुकीची माहिती एमआयडीसी इंडियाने ट्विट करून दिली होती.

25. २३ मे २०२२ रोजी भारत स्थित फ्युएल इथेनॉल कंपनी कार्निवल इंडस्ट्रीजने महाराष्ट्र सरकारबरोबर 207 कोटी रुपये गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. कंपनी नागपूर येथील मूल येथे गुंतवणूक करणार असून त्यातून 500 तरुणांना रोजगार मिळणार आहे. या गुंतवणुकीची माहिती एमआयडीसी इंडियाने ट्विट करून दिली होती.

26. २३ मे २०२२ रोजी ग्राम्सी बिझिनेस हब्स कंपनी आयटी क्षेत्राच्या विकासात महाराष्ट्रात 5000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. कंपनीने महाराष्ट्रा सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. या गुंतवणुकीची माहिती एमआयडीसी इंडियाने ट्विट करून दिली होती.

27. २३ मे २०२२ रोजी कलरशाईन इंडस्ट्रीजने महाराष्ट्र सरकारबरोबर ५१० कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या आणि ५०० लोकांना रोजगार प्राप्त होणार आहे. कंपनी उमरेड, नागपूर येथे गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीची माहिती एमआयडीसी इंडियाने ट्विट करून दिली होती.

28. २३ मे २०२२ रोजी एकट्या दावोस येथे महाराष्ट्र सरकारने ३० हजार कोटी रुपयाच्या (४ अब्ज डॉलर) एकूण २३ गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. ज्यामुळे राज्यातील तब्बल ६६ हजार तरुणांसाठी रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. तर दुसरीकडे, मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत, 2.2 लाख कोटी रुपयांच्या (29 अब्ज डॉलर्स) एकूण गुंतवणूकीच्या उद्देशाने 121 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. या गुंतवणुकीची माहिती एमआयडीसी इंडियाने ट्विट करून दिली होती. तसेच दावोस येथे उपस्थित असलेल्या तत्कालीन पर्यावरण मंत्र्यांनी म्हणजे आदित्य ठाकरे यांनी सुद्धा माहिती दिली होती.

29. २३ मे २०२२ रोजी रीन्यू पॉवरने राज्यातील नवीकरणीय उर्जा निर्मितीत ५०००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी सामंजस्य करार केला होता. त्यामुळे एकट्या दावोस मध्ये ८० हजार कोटी रुपयांच्या २४ सामंजस्य करारांचा मैलाचा दगड ठाकरे सरकारच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारने गाठला होता. या गुंतवणुकीची माहिती एमआयडीसी इंडियाने ट्विट करून दिली होती.

30. एअर लिक्विड ग्रुपने एमआयडीसी नागपूर येथे ऑक्सिजन उत्पादनात 130 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होते. राज्याला ऑक्सिजन उत्पादनात आत्मनिर्भरता प्राप्त करून देण्यासाठी ही गुंतवणूक एक मोठे पाऊल होती. या गुंतवणुकीची माहिती एमआयडीसी इंडियाने ट्विट करून दिली होती.

राज्यातील त्या प्रत्येक तरुणासाठी :
आता हे सर्व पुराव्यानिशी वास्तव समजून घेतल्यानंतर राज्यातील सर्व सुशिक्षित किंवा कमी शिकलेल्या तरुणांनी याचा गांभीर्याने विचार करायला हवा की रोजगार हेच एकमेव महत्वाचं साधन आहे जे त्यांचं भविष्य उज्वल करेल. नारायण राणेंच्या ‘त्या आदित्यला काय कळत?’, आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवण्यासाठी त्यांना चिडवण्याच्या नादात ‘म्याव म्याव’ करून स्वतःची राजकीय प्रगल्भता सिद्ध करणाऱ्या नितेश राणेंच्या वक्तव्यातून रोजगार निर्माण किंवा मिळणार नाही. एखादा सर्वसाधारण घरातील तरुण जेव्हा ८-१० हजाराच्या नोकरीसाठी मुलाखत देण्यास जातो तेव्हा त्याच्यावर किती दडपण असतं हे त्या तरुणालाच ठाऊक असतं. पण राजकीय कुटुंबातील आलेल्या आदित्य ठाकरेंनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी दावोस येथे जाऊन कंपन्यांना स्वतः प्रेझेंटेशन केलं होतं आणि ते देखील सोपं नसतं. ते देखील ट्विटरवर म्याऊ-म्याव करत विरोधकांना प्रतिउत्तर देत बसले असते तर वरती जे वाचलं ते सत्यात उतरलं नसतं.

Aaditya Thackeray

विद्यमान मुख्यमंत्री दहीहंडीत तरुण जमल्याच पाहून लगेच त्यांना आपण २ महिन्यापूर्वी कशी ५० थरांची हंडी फोडली याचे मार्केटिंग किस्से रुबाबात सांगत बसले आणि दहीहंडी उत्सवात भाग घेणाऱ्यांना रिझर्वेशन देखील जाहीर करत मार्केटिंग केलं. महाविकास आघाडीत दोन वर्ष आधीच शिंदे ५० थरांची हंडी फोडण्याची तयारी करत होते आणि परिणामी त्यांना ठाकरे सरकारने काही काम केलं की नाही हे कळू शकलं नाही. कारण त्यांचा सर्वाधिक संपर्क भाजप नेत्यांशी होता असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे तरुणांसाठी त्यांचा भविष्यकाळ सुधारायचा असेल तर भंपक आणि राजकीय नौटंकी करणाऱ्या नेत्यांच्या धार्मिक मुद्यांच्या ट्रॅपमध्ये न अडकता सुशिक्षित राजकीय तरुणांच्या मागे जाणं केव्हाही फायद्याचं असेल यात शंका नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Former CM Thackeray govt signed MoU in ruling time check details 17 September 2022.

हॅशटॅग्स

#Aaditya Thackeray(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x