मुंबई : सध्या लोकसभा प्रचाराचा जोर संपूर्ण महाराष्ट्रात वाढलेला असताना सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. त्यासाठी प्रचाराचे नवं नवे फंडे वापरण्यात येत आहेत. परंतु शिवसेनेचा मुंबई ते पालघर पर्यंतचा प्रचार हा मुख्यत्वे गुजराती भाषेत होताना दिसत आहे. भाजपसोबत युती करण्याचा शिवसेनेचा मूळ उद्देश केवळ गुजराती मतदार तर नव्हता ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या या गुजराती भाषेतील प्रचारातून मराठी मतदाराला गृहीत तर धरत नाही ना, अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे. मुंबई ते पालघरच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर गुजराती समाजाची लोक वास्तव्यास असल्याने शिवसेनेने मराठी मतदाराला गृहीत धरत गुजराती भाषेत प्रचार करण्यावर अधिक भर दिल्याचे पाहायला मिळत आहे.
तत्पूर्वी मागील ४-५ वर्ष उत्तर भारतीयांच्या मतांची बांधणी करणारी शिवसेना मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये उत्तर भारतीयांचे सन्मान मेळावे आयोजित करण्यात व्यस्त होती. परंतु लोकसभा निवडणूक जाहीर होताच, भाजपच्या पारंपरिक गुजराती मतांवर डोळा ठेवून गुजरातीमध्ये प्रचार करण्यावर अधिक जोर दिल्याचे जागोजागी पाहायला मिळत आहे.






























