22 February 2025 6:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch
x

आदित्य ठाकरेंना खुलं पत्र; ३ दशकं सत्ता, तरी औरंगाबादचे नाव 'कचराबाद' असे झाले आहे?

औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेच्यावतीने अनेक विकासकामांचे उदघाटन, भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज औरंगाबादमध्ये हजर झाले आहेत. त्यामुळे एमआयएम’चे आमदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर सडकून टीका करत एका खुल्या पत्राद्वारे सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

त्यांनी थेट आदित्य ठाकरेंना एक खुलं पत्रच पाठवलं आहे. त्यातून त्यांनी औरंगाबादच्या सर्व समस्यांचा पाढाच वाचला आहे. नेमकं काय म्हटलं आहे आमदार इम्तियाज जलील यांनी या खुल्या पत्रात आणि नेमके कोणते प्रश्न उपास्थित केले आहेत?

प्रिय आदित्य,

सुसंस्कृत व शैक्षणिक दृष्ट्याप्रगत असलेले तरुण सध्या राजकीय परिस्थितीवर बोलत आहेत व ती परिस्थिती सुधारावी अशी इच्छा बाळगत आहेत,अशा तरुणांपैकी आपण एक सुसंस्कृत तरुण आहात.

मी आपले औरंगाबाद शहरात स्वागत करतो.

  • औरंगाबाद शहर हे आशिया खंडातील सर्वात वेगाने वाढणारे आणि विकसनशील शहर आहे. असे असले तरी, सध्या हे शहर बकाल अवस्थेत आहे. कोणाच चुकतंय? कोण चूक करत आहे? आणि हे कोणामुळे घडत आहे? हे सर्वश्रुत व बहुचर्चीत प्रश्न सध्या औरंगाबाद मधील सर्वच नागरिकांना पडलेले आहेत. हे प्रश्न नागरिकांना का पडले आहेत, कारण ते या शहरावर निस्सीम प्रेम करतात.
  • आज हे जाहीर खुले पत्र मी आपणास लिहीत आहे, कारण मला माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत. या माझ्या एकट्याचा भावना नसून तमाम औरंगाबादकरांच्या आणि औरंगाबादवर निस्सीम प्रेम करणार्‍या नागरिकांच्या आहेत.
  • मला हे संपूर्णपणे माहिती आहे की, आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहात, बाळासाहेब ठाकरे हे स्वतः एक वलय होते आणि शब्दाला जागणारा नेता अशी त्यांची ख्याती होती.
  • आपल्यात आणि माझ्यात राजकीयदृष्ट्या आणि पक्षीय दृष्ट्या मतभेद असतील, यात काही वाद नाही. आपल्या दोघांचेही ध्येय, धोरण, पक्षीय विचार सर्व गोष्टी भिन्न असतील. एवढेच काय आपण राजकीय दृष्ट्या एकमेकांचे विरोधकही असू, पण आपण एक सुसंस्कृत तरुण आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगत असल्याने आणि आपण नागरिकांची नाळ ओळखून असल्याने मी हे जाहीर खुले पत्र आपणास लिहीत आहे.
  • औरंगाबाद महापालिकेत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ शिवसेना सत्तेवर आहे.आपल्याला असे नाही वाटत का, की शिवसेना औरंगाबादच्या बकाल अवस्थेत जबाबदार आहे? औरंगाबाद शहरात रस्ते, वीज, पाणी यांची दुरावस्था आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई सातत्याने भासत आहे, प्रदूषणाच्यादृष्टीने हे शहर अत्यंत बकाल झाले आहे. या बकाल अवस्थेमुळेच औरंगाबादचे नाव “कचराबाद”असे झाले आहे. ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या शहर “कचराबाद” होणे,हे योग्य वाटते का? महापालिकेच्या शाळांची तर अत्यंत दुरवस्था आहे. ह्या सर्व परिस्थितीला कोण जबाबदार आहे? औरंगाबाद शहराचे नाव दिवसेंदिवस खराब होत चालले आहे.
  • औद्योगिकदृष्ट्या व जागतिक पर्यटनाच्यादृष्टीने एकेकाळी प्रगत असलेले, नावाजलेले हे शहर आज प्रगत शहरांच्या क्रमवारीत खालच्या स्थानावर आहे, त्याची क्रमवारी घसरली आहे व सातत्याने घसरतच आहे. औरंगाबाद शहरात गेल्या काही वर्षांपासून पर्यटक येईनासे झाले. पर्यटकांची संख्या सातत्याने रोडावत आहे. हे असे का होत आहे? उत्तर अतिशय साधे व सरळ आहे. आदित्य, तुमच्या पक्षाच्या नेत्यांना या शहराच्या विकासाच्यादृष्टीने “टॉप प्रायॉरिटीज” काय असाव्यात? याचे भान राहिलेले नाही. कोणत्या कामांना किती प्राधान्य द्यायचे? त्याची किती जबाबदारी घ्यायची? याचे भान देखील राहिलेले नाही. त्यांच्यादृष्टीने “सत्तेत असणे” म्हणजे केवळ आपल्या झोळ्या भरणे आणि आपला स्वार्थ साधणे हा आहे. शहराचे काय वाटोळे झाले तरी चालेल, असे त्यांचे वागणे असते.
  • मी, महापालिकेच्या शाळांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी, मुलांना उद्याने मिळण्यासाठी, मनपाच्या खुल्या जागा विकसित करण्यासाठी , गरिबांना आरोग्यसुविधा सुलभ आणि अखंडित पणे मिळावी ह्यासाठी, गल्लोगल्ली (मोहाला-आधारित) क्लिनिक सुरु करावे ह्यासाठी, महानगरपालिकेकडे पाठपुरावा करत आहे. मात्र ह्याला खोडा घातला जातं आहे.
  • मी शहर विकासाचा प्रयत्न करीत आहे. परंतु हा विकास आपण पक्षीय विरोध विसरून एकत्रपणे केला तर अधिक सोयीचे होईल. आपण दोघे, कोणत्या दोन भिन्न राजकीय पक्षाचे आहोत, याकडे दुर्लक्ष करून या विकासाच्या वाटेवर सामुदायिक प्रयत्न करणेच आवश्यक आहे असे मला वाटते.
  • माझे असे ठाम मत आहे की, बाळासाहेब ठाकरे जिवंत असते आणि जर त्यांना विचारले गेले असते की,त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावावर स्मारक बांधायचेय तर त्यांनी त्यास पूर्णपणे नकार दिला असता.पण, औरंगाबादमध्ये आपल्याच पक्षातील पदाधिकार्यांनी तब्बल 25 एकर सरकारी जमीन त्यांच्या स्मारकाससाठी नियोजित केली आहे. आपण स्मारकाऐवजी महाराष्ट्रात नाव होईल, असे एक भव्य हॉस्पिटल किंवा ग्रँड म्युनिसिपल स्कूल बांधू शकत नाही कां आणि त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊ शकत नाही कां? अहो जर तुम्ही घाटी हॉस्पिटल किंवा सरकारी कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली असेल तर तुम्हाला हे लक्षात येईल की,शहराला आणखी एका चांगल्या रुग्णालयाची किंवा चांगल्या भव्य महापालिका शाळेची गरज आहे.
  • काही दिवसांपूर्वी मला असे कळले की,क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यासाठी महापालिका 1.50 कोटी रुपये रोख खर्च करणार आहे. हे योग्य आहे कां? छत्रपती शिवाजी महाराज लोकांच्या हृदयात राहतात असे तुम्हाला वाटत नाही कां? त्यांच्या पुतळ्याची उंची वाढवून त्यात कोणता फरक पडेल. हे पैसे हॉस्पिटल आणि शाळांमध्ये खर्च करायला हवे. किंवा तरुणाईला आपल्या महान राष्ट्रीय नायकांचा इतिहास, साहस आणि त्यांची शिकवण देण्यासाठी हा पैसा खर्च केला जाऊ शकत नाही कां?

आदित्य,

  • मी आपल्याला विनंती करतो की, आपण आपल्या पक्षाच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना सूचना कराव्यात की, त्यांनी महापालिकेत बसून नागरिकांच्या हितसंबंधाचे निर्णय घ्यावेत.
  • जसे लाखो शिवसैनिक तुमच्याकडे आस लावून पाहत आहेत, एका आशेने पाहत आहेत, तशाच माझ्याही भावना आहेत.
  • आपण शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आहात, आपली शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय मोठी आहे, म्हणूनच आपल्याकडे आम्ही बदलाच्या दृष्टीने पाहत आहोत. शहराच्या विकासाच्या दृष्टीने हे अधिक समर्पक ठरेल असे मला वाटते.
  • एमआयएम पक्षाचा नेता, एमआयएम पक्षाचा आमदार असूनही मी शिवसेनेच्या मोठ्या नेत्याला अर्थात तुम्हाला हे खुले पत्र दिले आहे. यावरून माझ्यावर टीकास्त्र सोडले जाईल, मला अद्वातद्वा बोलले जाईल, ह्यात काही शंका नाही, पण विश्वास ठेवामी फक्त माझ्या या शहरासाठी केले. कारण मी व माझ्यासारखे असंख्य औरंगाबादकर या “औरंगाबाद”शहरावर प्रेम करतो.

जय हिंद

इम्तियाज जलील

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x