भाजप आमदाराने पुन्हां वादग्रस्त विधान करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. भाजपचे आमदार सुरेंद्र सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू रामचंद्रांचा अवतार तर अमित शहा हे लक्ष्मणाचा अवतार असून युपीचे मुख्यमंत्री आणि ब्रह्मचारी असून ते हनुमानाचा अवतार आहेत असं वक्तव्य केलं आहे.
एका कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना भाजपचे आमदार सुरेंद्र सिंग यांनी ही मुक्ताफळं उधळली. भारतात रामराज्याची स्थापना करण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या भगवान राम यांचे नरेंद्र मोदी हे अवतार असून त्यासाठीच त्यांनी अवतार घेतला असल्याचे आमदार सुरेंद्र सिंग म्हणाले.
तर दुसरीकडे अमित शहा हे प्रभू रामचंद्रांचा भाऊ लक्ष्मणचा अवतार असल्याची मुक्ताफळं उधळली आहेत. अमित शहा कार्यशैली बुद्धिमत्तेच्या बाबतीत सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे सल्लागार चाणक्य यांच्याप्रमाणे असल्याचं ते म्हणाले.
दुसरा अजब दावा त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बाबतीत केला आहे. योगी आदित्यनाथ हे ब्रह्मचारी हनुमानाचा अवतार असून ते त्रिकुट म्हणजे राम, लक्ष्मण आणि हनुमान ते देखील पृथ्वीतलावर असल्याचे सुरेंद्र सिंग म्हणाले. त्यामुळे भारताच्या राजकारणात हेच त्रिकुट रामराज्याचे स्वप्न पूर्ण करेल अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली.






























