21 February 2025 3:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

पिंपरी: राज यांच्या सभेकडे प्रसार माध्यमं केंद्रित होण्याच्या चिंतेने उद्धव यांची सभा रद्द?

Uddhav Thackeray, Raj Thackeray, Shivsena, Maharashtra Navnirman Sena, Pune, Pimpari

पुणे: निवडणूक आली की नेत्यांची जाहीर सभांमधूनच जुगलबंदी सुरू होती. त्यात जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आमने सामने आल्यानंतर ही जुगलबंदी टोकाला पोहचते. विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात पहिली जाहीर सभा घेणार आहेत. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव हे पिंपरी चिंचवडमध्ये शिवसैनिकांना संबोधित करणार होते.

राज ठाकरे यांची बुधवारी ९ ऑक्टोबरला पुण्यात टिळक चौकात (अलका चौक) तर त्याच वेळी उद्धव ठाकरे यांची पिंपरीत संध्याकाळी ७ वाजता सभा होणार नियोजित करण्यात आली होती . त्यामुळे विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलं असताना हे दोन ठाकरे बंधू आपल्या सभांमधून कुणा लक्ष्य करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार असल्याने प्रसार माध्यमांचं देखील लक्ष लागून राहिलं होतं.

मात्र राज ठाकरेंच्या सभेवर प्रसार माध्यमांचं लक्ष केंद्रित होण्याच्या भीतीने आणि उद्धव ठाकरेंच्या सभेकडे माध्यमांनी कानाडोळा करण्याच्या भीतीने शिवसेनेने अचानक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विधानसभा निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्यातील पिंपरी-चिंचवडमधील बुधवारची (ता.९) सभा आज स्थगित केली आहे. त्यामुळे शहर शिवसेनेचा व त्यातही पिंपरीतील पक्षाचे उमेदवार व त्यांच्या समर्थकांचा काहीसा हिरमोड झाला आहे. कारण,या सभेच्या तयारीसाठी काल शहर शिवसेनेची बैठकही आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, याच दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पुण्यात सभा असल्याने उद्धव ठाकरेंची सभा प्रसार माध्यमं दाखवणार नाहीत या चिंतेने नियोजित सभा पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे.

आता, त्यादिवशी उद्धव ठाकरेंची सभा पिंपरीऐवजी नगर येथे होणार आहे, असे समजते. तर, पिंपरीतील सभा ही आता शेवटच्या टप्यात होणार आहे,असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (मावळ) गजानन चिंचवडे व पिंपरीचे आमदार व उमेदवार गौतम चाबूकस्वार यांनी सांगितले. ठाकरेंच्या संपूर्ण राज्य दौऱ्याचीच फेररचना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x