8 October 2024 10:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | SBI च्या 'या' फंडामुळे गुंतवणूकदारांची रोज दिवाळी, पैसा 4 पटीने वाढतोय, फायदा घ्या - Marathi News NBCC Share Price | PSU शेअरने 250 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा दिला, आता स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत अपडेट, मल्टिबॅगर शेअरवर होणार परिमाण, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर पुन्हा फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ओव्हरसोल्ड झोनच्या जवळ, 2800% परतावा देणारा शेअर BUY करावा की Sell - Marathi News IRFC Share Price | IRFC शेअर टेक्निकल चार्टवर 50% पुलबॅकचे संकेत, तज्ज्ञांनी दिला सल्ला, स्टॉक BUY करावा का - Marathi News Vedanta Share Price | रॉकेट तेजीचे धावणार वेदांता शेअर, FII आणि म्युच्युअल फंड कंपन्यांकडून खरेदी, ब्रोकरेज बुलिश - Marathi News
x

"लग्नाची वरात पण कोणाच्या घरात ?"

Marathi Stories, Marathi Katha, Marath laghu Katha, Marathi Kavita, Marathi Bhaykatha, Marathi Sahitya writing

भारतीय लग्न म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो, लग्नाचा हॉल ,सजवलेला मंडप, पाहुण्यांची ऊठबस भरजरी साड्या ,पक्वान्नांची जेवणं, मानपान आणि बरंच काही. साधारणतः हल्ली लग्नात रुसुन बसणं किंवा मांडवातून लग्न मोडून निघून जाणं असं घडत नाही, मात्र तरीही अशी एक भन्नाट गंमत माझ्या पाहण्यात आली ती सांगतो. खरं तर मुला-मुलींची पसंती होऊन लग्न ठरलं होतं. चिपळूणला, वराच्या घरी बरीच पाहुणे मंडळी जमली होती. लग्न हाॅलवरच होणार होतं, त्यामुळे घरी विशेष काही धावपळ नव्हती. मी जरी नवऱ्या मुलाचा नातेवाईक असलो; तरी माझी कुणाची कुणाशी विशेष ओळख नव्हती.

त्यामुळे लग्नाच्या आदल्या दिवशी लग्न घरी मी एकटाच इथून तिथे आणि तिथून इथे बसून वेळ काढत होतो. दरम्यान काही गोष्टी उगाचच कानावर पडल्या त्या अशा; की सदर वागदत्त वधू रूपाने सुमार आहे, मुलांच्या वडिलांच्या मनात त्यांच्याच संबंधितांमध्ये मुलगी सून म्हणून करून घेण्याची इच्छा होती पण तसं घडलं नाही, मुलाच्या आजीचा आजार वाढल्याने लवकरात लवकर नातवाला चतुर्भुज झालेला पाहायची तिची इच्छा असल्यामुळे हे लग्न घाईने ठरवलं गेलं होतं, इत्यादी इत्यादी. “म्हातारीनं मध्येच राम नाही म्हटलं म्हणजे मिळवलं” कुणीतरी मधेच पुढे सोडून गेलं, एकूणातच ह्या लग्नावर थोडं काळजीचे सावट होतं आणि त्यामुळे लग्न जर साधेपणात करायचं ठरलं होतं. कोणालाही काहीही न विचारता ही एवढी माहिती माझ्याजवळ गोळ्या झाली. मी आपला उगीचच एका खुर्चीत विसावलो. शेजारी एक आजोबा सुपारी चघळत बसले होते.

माझ्याकडे बघून त्यांनी आपणहूनच बोलायला सुरुवात केली. “आपण कोण?” “मी नवऱ्या मुलाचा काका,” मी उत्तरलो. “काका म्हणजे?” पुन्हा प्रश्न. “मी नवऱ्या मुलाचा मावस काका; त्याची आजी आणि माझी आई सख्ख्या चुलत बहिणी. नात्यांचा फळांना मी एका दमात सांगितलं. “होय काय!कुठे असता आपण?” मी उत्तर दिलं. “काय करता?” मी सांगितलं. “मग किती मुक्काम?” उद्या हाॅलवरुनच निघणार, रात्रीचे गाडी आहे; असं म्हणून मी लागलीच विचारलं “आजोबा तुम्ही कुठे असता?” मी सिंधुदुर्गातला. आचरे गाव आमचं. मी या नवऱ्या मुलाच्या आईचा काका. “बरं, बरं!” म्हणत मी उगाचच एक वर्तमानपत्र उघडलं, पण आजोबा बोलायचा घरात होते,” माझा नातू पण आला आहे; तो बघा, गुलाबी शर्ट, प्रमोद!” आजोबांनी अंगुलीनिर्देश अन केलं.

मी पाहिलं तर एक मध्यम बांध्याचा भाबडा मुलगा घरातल्या माणसांप्रमाणेच कामाला मदत करत होता. “हम्” मी म्हणालो. “तुम्हाला मुलं किती?” पुन्हा प्रश्न. मी सांगितलं. “मग काय करतात?” ह्या आजोबांचे प्रश्न काही थांबत नव्हते. खरं सांगायचं तर अनोळखी माणसांशी अशा घरगुती गप्पा मारायला मला फारसा आवडत नाही. अशा वेळी महागाई, भ्रष्टाचार झालंच तर राजकारण अगदीच नाही तर राशी आणि माणसं असे विषय चालतात; पण आजोबा मात्र फिरून फिरून त्याच विषयावर येत होते. “काय हो आजोबा, प्रमोद काय करतो तुमचा?” मी आपलं उगाच विचारलं. “दुकान आहे आमचं ते चालवतो, फुलांची शेती करतो आणि तुमचं इंटरनेट त्याचं काय ते करून देतो. अतिशय उद्योगी आहे हो तो.” आजोबांनी खुशीत सांगितलं. “पण एक प्रॉब्लेम आहे” जरा नाराजी तर ते म्हणाले. “प्रॉब्लेम?” “कसला?” मी आता लक्ष देऊन ऐकू लागलो. “प्रॉब्लेम म्हणजे लग्न जमत नाहीये त्याचं; मुलींना खेळ नको; आता त्याच सुद्धा लग्नाचं वय झालंय, हा नवरा मुलगा आहे ना त्यापेक्षा आमचा नातू मोठाच आहे,” हातवारे करून आजोबा बोलत होते. “पण काही अजून जमत नाही” सुस्कारा सोडून ते म्हणाले. “जमेल, जमेल त्याचा योग आला की जमेल” मी काहीतरी बोलायचं म्हणून बोललो. “तेच ना!” माझा तो धागा आजोबांनी अचूक पकडला. “त्याची पत्रिका सांगते त्याचं लग्न असं पटकन जमून जाणार आहे, पण अजून नाही जमलं!” “तुमचा विश्वास आहे ना यावर?” पुन्हा आजोबांचा प्रश्न. “हो ज्योतिष शास्त्रावर माझा विश्वास आहे, पण तुम्हाला कोण ज्योतिषी भेटतो यावरही हे अवलंबून आहे.”

आजोबा ऐकत होते ते पाहून मी पुढे म्हणालो,” पण एक सांगतो आजोबा, ज्योतिष्याप्रमाणे प्रयत्नही महत्त्वाचे, ते सोडले तर काहीच होत नाही.” “100%!” आजोबा खुशीत हातवारे करून म्हणाले. “आणि म्हणूनच आम्ही ठरवलंय.” आजोबा खुर्चीतल्या खुर्चीत उगीचच जवळ सरकले. “आम्ही म्हणजे मी आणि हीने. लग्नाचं आमंत्रण आलं की कोणी ना कोणी जायचं म्हणजे जायचंच!. तेवढ्याच ओळखी वाढतात, नवीन नवीन स्थळ कळतात.” म्हणून स्वतःच टाळी मारून हसले. “वयामुळे लग्नाआधी आणि नंतर एकेक दिवस राहतो आणि किमान तीन-चार तरी नवीन स्थळ मिळतोच” पुन्हा हास्य. आता मी ही त्यात सामील झालो मग मीसुद्धा खुर्चीतल्या खुर्चीत सरकून आजोबांना म्हणालो,”पण आजोबा, माझ्या कन्येचे यंदा कर्तव्य नाही बरं!” हे ऐकून आम्ही दोघांनीही एकमेकांना टाळी दिली व यथेच्छ हसलो. “मग यावेळी लग्नाला जायची पाळी तुमची होय?— मी. “नाही नाही दोघांची” — आजोबा. “म्हणजे?” मी कुतुहलाने विचारलं. “ती नवऱ्या मुलीच्या घरी उतरली आहे. सावर्ड्र्याला. इथून अर्ध्या तासावरच आहे ते. “त्याचं काय आहे, नवऱ्या मुलाची आई ही माझी पुतणी; आणि नवर्‍या मुलीचे वडील म्हणजे हीचा भाचा. त्यामुळे ही तिकडे आणि मी इकडे असे ड्यूटी करतोय.” पुन्हा दोघे मनमुराद हसलो. तेवढ्यात कुणीतरी चहा आणला आणि गप्पांमध्ये खंड पडला. आता बघा कोणाचे कोण नातेवाईक. पण त्यांची ओळख या लग्नाच्या दरम्याने झाली आणि नातवाचा लग्नासाठी धडपडणारे आजी-आजोबा मला जवळून दिसले. संध्याकाळ होऊ लागली होती.

मी बाहेरून पाय मोकळे करून आलो. पुन्हा चहा झाला मात्र मगाचचं मोकळं -ढाकळं वातावरण आणि गप्पा जाऊन जरा दबक्या आवाजातील कुजबूज जाणवली. वरपिता म्हणजेच माझा मावस भाऊही थोडा चिंतेत दिसला. काहीतरी गडबड आहे, असा विचार करून आजारी आजींच्या म्हणजे मावशीच्या खोलीत चक्कर मारून आलो. ती पलंगावर भिंतीला टेकून बसली होती. चेहऱ्यावर अगदी आनंद होता. काय नेमकं चाललंय काही कळायला मार्ग नव्हता. मघाचे आजोबा दिसले तर काहीतरी कळेल असं वाटलं पण तेही कुठे दिसले नाहीत. आणि प्रमोदही कुठे दिसत नव्हता. “उद्याचं लग्न होणं कठीण दिसतंय!” कोणीतरी फपुटपुटलं. ‘असं काय झालं असेल?’ हा विचार माझ्या मनातून जाईना. अतिशय शांततेत जेवणं पार पडली. बायकांच्या गप्पागोष्टी, मेंदी काढतानाचे हास्यविनोद आवराआवरी करुन, तयारीवर शेवटचा हात फिरवण्याची धांदल काहीच न दिसता पाहुणेमंडळी झोपी गेली.

त्यानंतर आजोबा आणि प्रमोद बाहेरून आले. घरात मात्र हळू आवाजात उशिरापर्यंत बोलणी चालू होती. दुपारी बाराचा मुहूर्त होता मात्र पाहुणेमंडळी सकाळीच हॉलवर आली. मी पुन्हा एक खुर्ची पकडली. का कोण जाणे पण इथेही वातावरणात उत्साह नव्हता. लगबगीने फिरणाऱ्या आजोबांना बघून मी त्यांच्याशी बोलायला गेलो, तोच एक आजी त्यांना बोलावून घेऊन गेल्या. त्याच त्यांच्या सौभाग्यवती असाव्यात आणि अशातच एक बातमी येऊन धडकली… “नवरी मुलगी लग्नाला तयार नाही!” झालं इतका वेळ कुजबुजतात बोलला जाणारा विषय आता उघडपणे चर्चेला आला आणि मग सगळे “क” कार एकदम बाहेर पडले. पैकी, “का?” हा सर्वात मोठा आणि दीर्घ होता. एव्हाना वरमायीचेच डोळे झरु लागले, आणि वरपिता मान खाली घालून बसले. मध्येच उगाचच इकडून तिकडे आणि तिकडून इकडे बघत होते. आणि नेमकं काय झालंय हे वऱ्हाडी मंडळींना कळायचं होतं. मग उडतच बातमी आली, ‘दोन दिवसांपूर्वी झालेल्या साखरपुड्यात नवऱ्यामुलीला जे दागिने मुलाकडून दिले गेले होते; ते पूर्ण सोन्याचे आढळले नाहीत. त्यामुळे वर पक्षाला ही त्यांची फसवणूक वाटली.

त्यामुळे आता हे लग्न मुलीकडच्यांना मान्य नाही.’ लागलीच मुलाकडून त्याचे वडील, काका आणि काही ज्येष्ठ मंडळी समजूत काढायला मुलीकडे गेली, आणि ‘हे कसं झालं’ आणि ‘आता पुढे काय होणार?’ यावर वर्‍हाडी मंडळींमध्ये सुमारे दीड तास चर्चासत्र रंगलं. लग्नाला येणाऱ्या मंडळींना लग्नाच्या पेढ्याऐवजी खमंग चर्चा चढायला मिळाली. तेवढ्यात आजोबांनी लगबगीने पुढची बातमी आणली,” सुमन तुला व्याह्यांच्या घरी जायचंय. लगेच. आणि दागिन्यांच्या पावत्या आहेत का? आत्ता? खरेदीला होतीस ना तू?” त्यांनी एका दमात विचारलं. “होय हो काका, मी खरेदीला होते. पण पावत्या इथे कशाला? म्हणून नाही आणल्या.” रडत- रडत वरमाय म्हणाली. मग तिचं सांत्वन करणाऱ्या वहिन्या आणि आज्यांच्या आधाराने मुलीच्या घरी जायला गाडीत बसली. त्यावेळी तिचं रडणं आणि सजवलेली गाडी हे फारच विषोभित दिसत होतं. नवऱ्या मुलाचा ही आता संयम सुटत होता. मुहूर्ताची वेळ जवळ येत होती. पण आता तिकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. आणि “आता कसलं लग्न होतंय!” म्हणून लग्नाला आलेली बरीच मंडळी परतीच्या प्रवासाला जायला गेली.

हॉलवर आम्ही मोजकीच मंडळी शिल्लक होतो. त्यात काही जवळची नातेवाईक मंडळी, काही स्थानिक पाहुणे आणि काही माझ्यासारखे उशिराची गाडी असलेले, एवढेच होतो. सामोपचाराला गेलेलं वऱ्हाड हात हलवत परत आलं. पुन्हा एकदा रडण्याचा कार्यक्रम झाला, आणि त्यातून असं कळलं की मुलीला दिलेला हार आणि पाटल्या पूर्ण सोन्याच्या नसून एक ग्राम मध्ये घडलेल्या आहेत.

“वाट्टेल ते आरोप केले हो त्यांनी.” मुलाची आई म्हणाली. “हो, ना. म्हणे परिस्थिती नव्हती तर खोटं का सांगितलंत? आम्ही काही पैसा बघून मुलगी देणारे नव्हे; असंही म्हणाले.” मुलाच्या काकूने पुष्टी दिली. “जरा शांत व्हा. काहीतरी गैरसमज झाला असेल!” आजी सर्वांना उद्देशून म्हणाल्या. त्या दोन्हीकडच्या असल्यामुळे त्यांचं काम जरा कठीणच झालं होतं. हे ऐकताच मुलाची आई ताडकन उठून म्हणाली, “आजी तुम्ही दोन्हीकडच्या नातेवाईक आहात; आम्हाला ओळखता. आम्ही आहोत का असे?” पुन्हा रडं. “नाही गं!” आजी तिचं सांत्वन करत म्हणाल्या. मी ओळखते तुम्हाला. हा गैरसमजच आहे.

“ते काही नाही!” इतका वेळ शांत बसलेला नवरदेव उठला. “आता पुरे झाला तमाशा.” “बाबा, यावर मुलीचं काय मत आहे?” त्याने विचारलं. “ती काहीच बोलली नाही फक्त दागिने दाखविले, गुजरात मध्ये खरंच नोकरी करतोस की तेही खोटं असंही बोललं गेलं.” मुलाचे वडील चिडून म्हणाले. “बास!” “खूप झालं!” “आपल्याला माहिती आहे,की आपण खरे दागिने दिलेले आहेत. जाऊदे हे लग्न मोडलं!” त्याच्या या शब्दांवर, “अरे!” हा शब्द विविध स्वरांत आवाजांत आणि विविध ठिकाणांहून उच्चारला गेला. “हो माझा निर्णय झाला आहे. आपल्या घराला खोटं ठरवणार्यांशी हे नातं नकोच! पुरे झालं.” “अरे पण पुढे काय करणार? कंपनीत काय सांगणार तू?” मुलाची आई म्हणाली. “पुढचं पुढे बघू. आत्ता चल घरी.” मुलगा चिडून म्हणाला. “अरे पूजा ठरली आहे; त्याची आमंत्रण देऊन झाली आहेत आणि आत्ता नाही सांगायचं?” इती आई. “हे बघ आई, मी दुसऱ्या कुठल्याही मुलीशी लग्न करेन पण तिच्याशी करणार नाही.” मुलगा आणखीनच चिडला. “तुम्ही जरा शांत व्हा” मुलाचे वडील वैतागून म्हणाले; पण वाद काही थांबत नव्हता. तोच, “हेमंता जरा इकडे ये.” म्हणत ते आजोबा मुलाच्या वडिलांना बाजूला घेऊन काहीतरी सांगू लागले; त्यातले काही संवाद आमच्या कानी पडले, ते असे.

“असं कसं आजोबा? नाही जमणार.— मुलाचे वडील.
“नाही कसं? तू त्याला विचारून तर बघ.— आजोबा. “नको तसं नको, घाई -घाई.— वडील
“भेटून- ठरवून असं झालाच ना?” — आजोबा
“तिला कोण विचारणार?” —- वडील.
“मी विचारतो. आधी मुलाचा विचार घ्या.” — आजोबा.

पुन्हा एकदा एकमेकांना बाजूला घेऊन बोलणी चालू झाली त्यात दिसणार्‍या हातांच्या कवायतीं मधून काही अर्थबोध होत नव्हता, उत्कंठा मात्र ताणली जात होती. मुलाचे आई-वडील आणि इतर जण मुलाभोवती गराडा घालून होते, आणि हे आजी-आजोबा एकदा या गराड्यात आणि एकदा खोलीत असे लगबगीने फिरत होते. तेवढ्यात, “मला तिच्याशी आधी बोलायचय” असा मुलाचा खणखणीत आवाज ऐकू आला. “हो, चालेल, बोल तू.” मुलाचे आई-वडील हळू आवाजात म्हणाले. मग नवरा मुलगा त्या खोलीत गेला आणि मुलाचे आई वडील, काका काकू, आत्या यांच कोंडाळं खुसफुस करत बोलू लागले. इकडे आम्हा उर्वरित बघ्यांच्या पोटात कावळ्यांनी कलकलाट चालवला होता, पण करतो काय? मात्र आता फार वेळ लागला नाही. मुलगा त्याच्याबरोबर वर पक्षातलीच एक मुलगी आणि बरोबर तिचे आई-वडील असावेत, असे बाहेर आले. मुलाच्या वडिलांजवळ जाऊन काहीतरी बोलले त्यांचा चेहरा आनंदाने उजळला. तरीही पुन्हा एकदा खात्री करून घेऊन त्यांनी स्टेजवर जाऊन माईक हातात घेऊन घोषणा केली.

“माझ्या मुलाचं सविताशी ठरलेलं लग्न जरी मोडलं असलं तरी आत्ता माझ्या भावाची मुलगी पूर्वा आणि माझा मुलगा रवींद्र यांचं लग्न आत्ताच हॉलवर पार पडेल. आता आपल्या पारंपारिक पद्धतीने साखरपुडा होईल. मग भोजन, आणि त्यानंतर लगेच लग्न. यावर टाळ्या कडाडल्या. त्या लग्नाच्या आनंदाबरोबरच ‘भोजन’ या शब्दासाठीही होत्या.

पुढच्या दहा मिनिटांत ओट्या-बिट्या भरून मंडळी जेवायला गेली सुद्धा! रडणारी वरमाय पुन्हा खुश झाली आणि रडायची पाळी पूर्वाच्या आईकडे म्हणजे नव्या वधू माईकडे गेली. अधून-मधून “आम्ही आत्ता फक्त मुलगी आणि नारळ देऊ शकतो” तचे सूर उमटत होते. “जाऊदे हो, तुम्ही आत्ता मुलगी देऊन आमची लाज राखत आहात.” असे प्रति सूर लागत होते. आजोबांनी हॉलवाल्यांकडून पंचांग मिळवून चांगला मुहूर्त बघून दिला. आता जास्त वेळ न लावता महत्त्वाचे तेवढेच विधी पार पाडायचे असं उभय पक्षांनी ठरवलं. लग्न पारंपारिक पद्धतीने न होता वैदिक पद्धतीने करायचं ठरवलं.

मंडळी यथेच्छ जेऊन उठली. लग्नाचे विधी सुरू झाले आणि तरीही या आजी-आजोबांचे धावपळ चालूच! मी आजोबांना म्हटलं सुद्धा,” बसा हो जरा आता लग्न होणार!” तसे म्हणाले “नको नको, आम्हाला दोन्ही बाजू सांभाळाव्या लागताहेत. इथे अक्षता टाकून मुलीच्या घरी जाणार आहोत आम्ही.” असे सांगून काही वेळातच ते प्रमोद बरोबर गाडी काढून गेलेसुद्धा!

पण मंडळी लग्न एवढ्यातच होणार नव्हतं. दुसरा मुहूर्त जवळ आला तोच आधीची नवरी मुलगी, मुलीची आई आणि तिचे काही नातेवाईक हॉलवर हजर! ‘आता हे इथे कशाला आलेत?’ म्हणत अनेकांनी कपाळाला आठ्या घातल्या; आणि चक्क ती मुलगी त्यांचं ते पूर्वनियोजित लग्न व्हावं म्हणून नवऱ्या मुलाला विनवू लागली..! पुन्हा हॉलवर शांतता. पुन्हा प्रश्न आता काय? मात्र नवरामुलगा ठामपणे म्हणाला, “माझं लग्न या पूर्वाशीच होणार. या तुम्ही.” मग मुलगी आणि तिची आई, वर पक्षातील ज्येष्ठ मंडळींना विनवू लागली. त्या विनवण्यांतून, संभाषणातून मधून मधून रागाचे स्वरही येऊ लागले. आता पुन्हा मुहूर्त जवळ आला होता. हाही मुहूर्त चुकतोय की काय? असं अनेकांना वाटलं. मुलीच्या आणि तिच्या घरच्यांच्या विनवण्यांकडे दुर्लक्ष करून विधी चालूच राहिले. मग एकीकडे जुन्या वधू पक्षातील मंडळींचे संतापलेले आवाज तर दुसरीकडे भटजी म्हणत असलेले सुश्राव्य मंत्र, यांची जुगलबंदी झाली. जुन्या वधूपक्षाचं म्हणणं, “लग्न मोडणल्याचं न कळवताच परस्पर दुसरं लग्न जमवलंतच कसं?” तर वरमंडळी वरचढपणे म्हणत होती, की ‘दागिन्यांमुळे मुलगी लग्नाला तयार नाही हे तुम्हीच सांगितलंत मग लग्न मोडलंच!’

मुहूर्त जवळ आला. अक्षता वाटल्या जाऊ लागल्या. त्यातच मुलाच्या एका अतिहौशी मित्राने तिथे आलेल्या सविताच्या आणि तिच्या आईच्या हातात मुद्दाम अक्षता देऊन म्हटलं, “सरदेसाई आहोत आम्ही, एक नाही म्हणाली तर दुसरी उभी करू. पण लग्न पार पाडणारच!” झालं! मुलीचा भाऊ संतापला. आता हा प्रश्न केवळ ठरल्या मोडल्या लग्नाचा न राहता तो त्यांच्या अस्मितेचा बनला. लागलीच डोक्यावरचा फेटा आपटून तो म्हणाला, “आम्ही ही सरपोतदार आहोत. काही कमी नाही. आमच्याही मुलीचं लग्न उद्याच लावून देऊ. लग्नाला यायचं बरं का!” म्हणत त्याच अक्षता त्याने अक्षता वाटणाऱ्या च्या हातावर टेकवल्या आणि सर्व मंडळी आल्या पावली निघून गेली. वधूवरांच्या गळ्यात माळा पडल्या आणि एकदाचं लग्न लागलं..!

मी माझं सामान आवरून हॉल सोडला, तेव्हा चांगलाच काळोख पडला होता. चालतच स्टॅंड वर गेलो. माझ्या एस्. टी. ला वेळ होता म्हणून बसलो. तोच मागून “ओ काटदरे!” अशी हाक आली. मी वळून बघितलं तर तेच आजोबा! मी म्हटलं “आजोबा इथे कुठे?” तर म्हणाले, “निघालात की काय?”
“म्हटलं हो, लग्न झालं. निघताना तुम्हाला शोधत होतो पण तुम्ही गायबच!”

“होय हो. मुलीच्या घरी जावं लागलं ना. पण आनंदाची बातमी आहे. माझा नातू चि. प्रमोद याचा विवाह चि. सौ. का. सविता हिच्याशी सकाळी 09:50 या मुहूर्तावर होणार आहे; तेव्हा आत्ता तुम्ही माझ्याबरोबर चला!” आजोबा एका दमात म्हणाले, नी माझा हात धरून यायलाच लागले. “काय सांगता काय?” मला धक्काच बसला. “खरंच सांगतोय!” आजोबांचा आनंद गगनात मावत नव्हता. “पण मुलीकडच्यांननी किती गोंधळ घातला होता आठवतंय ना? मग तिच्याशीच?” मी आश्चर्याने म्हणालो. “कशाला इतकी घाई?”

“तो गैरसमज होता हो!” हात झटकून ते म्हणाले. “म्हणजे?” आता हा धक्का माझ्यासाठी खूप मोठा होता. आजोबा सांगू लागले, “त्याचं काय झालं सविताचे दागिने केले मुलाकडच्यांनी, सविताच्या बहिणीला ते डिझाईन आवडलं. मग तिने स्वतःसाठी तसेच दागिने केले. लग्नाला येताना बरोबर घेऊन आली. साखरपुड्याच्या वेळी सविताला मुलाकडच्यांनी खरे दागिने दिले. ते सगळ्यांनी हाताळले. ते ठेवताना झाला असेल घोळ!” ‘घोळ’वर जोर देऊन आजोबा म्हणाले. मला क्षणभर वाटलं घोळ झाला की घातला? ईश्वरच जाणे. “अहो दोन वाजताच कळलं होतं की खरे दागिने सापडले आहेत, पण आता बोलायला तोंड कुठे होतं? मग मी आणि प्रमोदने जाऊन आणले ते, आणि तेव्हाच या लग्नाचाही सांगितलं. तशी सर्व मंडळी आली आणि हात हलवत गेली.” असं म्हणून त्यांनी सुस्कारा सोडला; आणि पुढे सांगू लागले.

“लग्न लागल्यावर पुन्हा मी आणि ही गेलो आणि आमच्या प्रमोदसाठी थेट मागणीच घातली.” टाळी देत हसत ते सांगू लागले. “सुरुवातीला हो नाही चालू होतं. पण मुलीच्या भावाने भर मांडवात “उद्या लग्न लावून देऊ” सांगितलं होतं. मुलगीही म्हणाली, “तुमच्या दागिन्यांच्या खर्‍या-खोट्या भानगडीत माझं लग्न राहिलं. आता लोक मला हसणार! मग झाले तयार!” “प्रमोदच्या आई बाबाला ताबडतोब बोलावलंय. निघाले आहेत ते स्पेशल गाडीने. तर असं जमलं!” पुन्हा आजोबांचे हातवारे आणि आता अतिआनंदामुळे हातवाऱ्याबरोबर शरीरालाही झोके देत होते. “आजोबा, मी म्हणालो, तुमच्या नातवाचं लग्न ठरलं ही आनंदाची गोष्ट आहे. पण मला नाही पटत हो हे दिलेलं कारण!” “जाऊ द्या हो विश्वासराव” आजोबा मला म्हणाले. “माझ्या नातवाचा लग्नाला यायचंच!” मी म्हटलं “आता गाडी येईल माझी! “त्याचं काय एवढं! उद्याची पकडा, चला चला आणि उद्या सुट्टी आहे. चला तुम्ही. उद्या तुमच्या मुलीच्या लग्नाला फायदा होईल कदाचित! ”

“एक मिनिट आजोबा” मी थांबलो. “उद्या तुमच्या नातवाचं लग्न उरकून, माझ्या घरी जाऊन, माझ्या मुलीचं लग्न! एवढं नाही होणार एका दिवसात!” मी एका दमात म्हणालो. यावर दिलखुलास हसून

आजोबा म्हणाले “काय हो तुम्ही पण शब्दात पकडता” आणि माझा हात धरून मला नेऊ लागले. मला म्हणाले,” मी म्हणालेलो की माझ्या नातवाचं लग्न पटकन जमुन जाणार आहे, बघा तसंच झालं!” पण मी मात्र आज रात्रीपासून उद्याच्या 24 तासात काय काय घडेल किंवा घडू शकेल या संभाव्य घटनांच्या विचारात उगाचच दडपणाखाली आजोबांबरोबर जाऊ लागलो.

 

लेखिका – सौ. जयंती योगेश काटदरे

राहुन गेलेल्या बातम्या

x