शूर मराठ्यांचा सर्वात मोठा शत्रू...माहित नसलेला औरंगजेब
मराठ्यांशिवाय औरंगझेबाचा आणि औरंगजेबाशिवाय मराठ्यांचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. याच सगळ्यासाठी आपला शत्रू तरी किती बलाढ्य होता हे जाणून घ्यायलाच हवे.
औरंगजेब… हे नाव कानांवर आलं कि फारसा कुणालाही आनंद होत नाही कारण, औरंगझेब म्हणजे आपल्याला आठवतो मराठ्यांचा शत्रू, दृष्ट, कपटी आणि शंभुराजांना जीवे मारणारा एक मुघल सम्राट. औरंगझेबाबद्दल फारशी कुणी माहिती करून घेत नाही पण आज आपण हेच बदलणार आहोत, आज आपण चक्क औरंगजेबाविषयी जाणून घेणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न असेल कि का बरं औरंगझेबाची माहिती घेणे इतके आवश्यक आहे ? मंडळी, आपले शिवराय किती मोठे होते, शिवरायांचा आणि मराठ्यांचा लढा किती मोठा व अवघड होता हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्यांचा शत्रू औरंगजेब किती बलाढ्य होता हे जाणून घेणे गरजेचे आहे.
शिवाजी महाराज, मराठे आणि औरंगझेब हे एकमेकांत गुंतलेले आहेत; मराठ्यांशिवाय औरंगझेबाचा आणि औरंगजेबाशिवाय मराठ्यांचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. याच सगळ्यासाठी आपला शत्रू तरी किती बलाढ्य होता हे जाणून घ्यायलाच हवे. आज पाहूया औरंगजेबाकडे, मराठ्यांचा शत्रू म्हणून नाही पण, एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून आणि पाहूया कसे होते त्याचे आयुष्य.
तर, औरंगजेबाचे पूर्ण नाव आहे, ‘अबुल मुझफ्फर मुई-उद-दिन मुहंमद’. औरंगझेब आणि आलमगीर अशा नावांनीही त्याला संबोधले जात असे. बरं, औरंगझेब म्हणजे सिंहासनाची किंवा गादीची शोभा (वाढविणारा) आणि आलमगीर म्हणजे जगाचा राजा किंवा जगावर राज्य करणारा अशा अर्थाच्या दोन पदव्या त्याजवळ होत्या.
औरंगजेबाचा जन्म २४ ऑक्टोबर १६१८ रोजी, गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यातील दाहोद/दोहाद या गावी झाला. औरंगजेब पूर्ण ८९ वर्षांचे लांबलचक आयुष्य जगून शेवटी २० फेब्रुवारी १७०७ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर येथील भिंगार गावी मरण पावला. मुघल सम्राट शाहजहान आणि मुमताज महल यांचा तिसरा मुलगा म्हणजे औरंगझेब होय. शाहजहान बादशाहला एकूण ६ अपत्ये आणि यापैकी, पहिला आहे ‘दारा शुको’, ‘शुजा’ आहे दुसरा, ‘औरंगजेब’ तिसरा आणि चौथा मुलगा मुरादबक्ष आणि याशिवाय शाहजहानला २ मुली होत्या, त्यांची नावे जहानआरा आणि गौहरआरा अशी आहेत.
औरंगजेबाचे व्यक्तिमत्त्व
औरंगजेब हे व्यक्तिमत्त्व म्हणजे अतिशय किचकट असे आहे. एकाच व्यक्तीमध्ये अनेक स्वभावाच्या छटा आपल्याला दिसून येतात आणि म्हणूनच औरंगजेबाचा अभ्यास करणे किंवा त्याबद्दल जाणून घेणे अतिशय रंजक आहे. औरंगझेब फार शांत होता, तो गरजेचे तेवढेच बोलत असे, फारशी बडबड करणे त्याच्या स्वभावात नव्हते. अगदी लहानपणापासून तो गंभीर आणि बऱ्याच विचारांत गुंतलेला असे. लहानपणापासूनच औरंगजेब प्रेमाला, मायेला पोरका झाला होता. त्याच्या आई-वडिलांचे प्रेम त्याला फारसे मिळाले नाही आणि यात अधिक भर म्हणजे तो सात वर्षांचा असतांना त्याच्या आजोबांनी (जहांगीर) त्याला नजरकैदेत ठेवले.
मुघल घराण्यात एकमेकांना संपवून सत्तेवर येण्याची महान परंपरा देखील त्याने लहानपणापासून स्वतः अनुभवली होती आणि या सर्व कारणांमुळे नात्यांबद्दल आत्मीयता, प्रेम, विश्वास वगैरे गोष्टी औरंगजेबासाठी अनोळखी होत्या. औरंगजेब अतिशय धार्मिक होता. औरंगजेब इस्लाम धर्मातील सुन्नी जमातीमधील हनफी पंथाचा अनुयायी होता. आपल्या धर्मात लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीचे तो पालन करण्याचा प्रयत्न करीत असे, इस्लाम धर्मातील नमाज, रोजा, जकवा (दानधर्म), हजयात्रा व कुराणपठण (तिलावते कोराण) अशे पाच नियम तो नेमाने मानत असे. दारूच्या थेंबालाही औरंगझेबाने कधी स्पर्श केला नाही इतका तो कट्टर अनुयायी होता.
परंतु कपटीपणा, हत्या, लबाडी वगैरे गोष्टी त्याला सोडणे जमलेच नाही आणि या आपल्या पापांसाठी अल्लाह आपल्याला काय शिक्षा करेल हा विचार सारखा त्याच्या मनात असे. मुस्लिम धर्मग्रंथ कुराण आणि मुस्लिमांचे काही नियम-कायदे सांगणारे हदीस हे औरंगझेबाला तोंडपाठ होते आणि त्याने स्वतः कुराणच्या २ प्रति लिहून मक्का आणि मदिना येथे नजर केल्या होत्या. औरंगझेबाचे पर्शियन, हिंदुस्थानी आणि अरबी भाषांवर प्रभुत्व होते. लहानपणापासूनच तो अनेक धर्मगुरुंशी धार्मिक चर्चा करीत असे. एकंदरीतच औरंगजेब अतिशय बुद्धिवान होता हे दिसून येते. औरंगजेब अतिशय कडक आणि शिस्तप्रिय व्यक्ती होता. आपल्या एका इशाऱ्यावर आपले काम झाले पाहिजे असा कडक वचक त्याचा दरबारावर होता.
औरंगजेबाने इस्लामच्या आज्ञेप्रमाणे ४ निकाह/विवाह केले होते आणि याशिवाय तरुण वयात त्याचे एका मुलीवर प्रेमदेखील होते. औरंगझेबाने ४ विवाह केले, त्याची पहिली पत्नी होती दिलरसबानू बेगम, दुसरी होती नवाबबाई, तिसरी होती औरंगाबादी महल आणि चौथी पत्नी होती उदेपूर बेगम; याशिवाय हिरा जैनाबादी या मुलीसोबत औरंगझेबाचे प्रेमप्रकरण देखील होते. परंतु हिरा काही कालावधीतच मृत्यू पावली आणि तेव्हापासून औरंगझेब मुख्यत्वे एकाकी झाला. पहिल्या पत्नीपासून औरंगझेबाला झेबुन्निसा, जिनत उन्निसा, जुबेदत उन्निसा या मुली आणि आजम व अकबर हि दोन मुले; दुसऱ्या पत्नीपासून महंमद सुलतान, मुअज्जम हि दोन मुले आणि बद्रुन्निसा हि एक मुलगी; तिसऱ्या पत्नीपासून मेहर उन्निसा हि मुलगी व चौथ्या पत्नीपासून कामबक्ष हा मुलगा अशी एकूण ९ अपत्ये होती.
औरंगजेबाच्या काही शौर्यकथा
औरंगझेब लहानपणापासूनच अतिशय तल्लख बुद्धीचा होता, सोबतच तो धूर्त, हुशार आणि धाडसी होता. इतिहासात त्याच्या शौर्याचे आणि धाडसाचे अनेक किस्से आहेत. त्यापैकी हत्तीशी दिलेली झुंज त्याच्या बालवयातील धाडसाची जाणीव करून देते. औरंगजेब साधारण १४ वर्षांचा असतांनाची हि गोष्ट आहे. बादशाह शहाजहानसाठी हत्तीची झुंज भरविण्यात आली होती आणि हि झुंज पाहण्यासाठी सर्वांसोबत औरंगजेब आणि त्याचे तीनही भाऊ एकत्र मैदानात घोडे घेऊन जवळ उभे होते. हत्तीची झुंज जसजशी रंगू लागली तसे हे भाऊ ते पाहण्याच्या नादात जवळ जाऊ लागले आणि हत्तींच्या झुंजीत एका हत्तीने दुसऱ्या हत्तीला हुलकावुन लावले आणि त्या पिसाळलेल्या हत्तीच्या नजरेत आला तो म्हणजे औरंगजेब.
हा हत्ती आक्रोशाने औरंगजेबाकडे धावत येऊ लागला. अशात घोड्यावरून औरंगझे सहज पळू शकत होता परंतु, त्याने आपल्या शक्तीने घोडा आहे त्याच जागी अडवून ठेवला आणि घोड्यावरून भाला हत्तीच्या दिशेने फेकून मारला आणि मग हत्ती अजूनच खवळला आणि त्याने सोंडेच्या एका प्रहारात घोड्याला जमीनदोस्त केला पण घोड्यावरून पडून देखील औरंगझेब उठला. हातात तलवार घेऊन तोच हत्तीकडे धावला आणि तलवारीने हत्तीच्या सोंडेवर सपासप वार केले. हि सगळी झटापट चालू असतांना औरंगझेबाचे भाऊ आणि इतर मंडळींनी येऊन हत्तीला आवर घातला. हा प्रसंग साधा वाटत असला तरी प्रत्यक्ष अनुभव घेणे तोसुद्धा वयाच्या १४ व्या वर्षी म्हणजे खरंच हिम्मतीचे काम आहे.
दुसरा प्रसंग अंगावर काटा आणणारा आणि औरंगझेबाच्या धर्मवेडेपणाची व हिम्मतीची साक्ष देणारा आहे. औरंगजेबाच्या राजकारणातील प्रवेशानंतर त्याने केलेली कामगिरी पाहता बादशाहने त्याला बाल्ख (मध्य आशिया) मध्ये युद्धासाठी पाठवले होते. या युद्धात औरंगजेबाचा सामना होता तेथील बादशाहचा मुलगा अझीझ खान याच्याशी. युद्ध मोठ्या प्रमाणावर चालू होते, सगळीकडे हलकल्लोळ माजला होता आणि अझीझ खान व औरंगझेब आमनेसामने होते. युद्ध आणि हल्ले-प्रतिहल्ले, भाले, तलवारी, बाण यांचा मारा चालू होता. या सगळ्या परिस्थितीत नमाजाची वेळ झाल्याची औरंगझेबाच्या लक्षात आले. हे लक्षात आल्यावर औरंगझेबाने कमालच केली; त्याने अंगातील चिलखत काढून ठेवले, घोड्यावरून पायउतार झाला रणांगणावर दोन्ही सैन्याचे हल्ले प्रतिहल्ले चालू असतांना एक चादर खाली अंथरून त्यावर औरंगझेब भर रणांगणाच्या मध्यात नमाज पडला.
त्याच्या आजूबाजूने वेगाने सुटणाऱ्या बाण, तोफगोळे व भाल्यांची देखील त्याला परवा नव्हती इतका मग्न होऊन तो नमाज पडत होता. आपल्याला विजय मिळणारच आहे अशा आत्मविश्वासात औरंगझेबाला नमाज पडतांना पाहून त्याचा शत्रू अझीझ खान विचारात पडला आणि अशा माणसाशी शत्रुत्व आपल्याला महागात पडेल हे त्याला कळून चुकले आणि त्याने युद्ध थांबवून तह करण्याचा मार्ग निवडला.
सत्ता व राजकारण
औरंगजेबाने वयाच्या १६ व्या वर्षी सैन्यात प्रवेश केला. तिथे लक्षणीय कामगिरी करून मग त्याची नेमणूक १६५२ साली दक्खनच्या सुभेदार पदी झाली. औरंगाबाद व गुजरातच्या मधला पट्टा बागलाण म्हणून ओळखला जाई, हा बागलाण प्रदेश व तेथील ९ पैकी ७ किल्ले औरंगजेबाने ताब्यात घेतले. गुजरात प्रांतावर त्याची नेमणूक झाली असता तेथील महसूल औरंगजेबाने वाढविण्यात यश मिळविले. यानंतर, सिंध वगैरे प्रांतावर देखील त्याची नेमणूक झाली. पुढे काही वर्षे सुरळीत कारभार चालू असतांना शहाजहान अत्यंत आजारी पडला, यावेळी औरंगझेब दक्खनचा सुभेदार होता. आता दिल्लीची सत्ता हस्तगत करण्यासाठी औरंगजेबाने गोड बोलून, कपट करून आपल्या सगळ्या भावंडाना ठार केले आणि स्वतः ५ जुन १६५९ रोजी सत्तेवर आला.
५ जुन १६५९ ते २० फेब्रुवारी १७०७ (औरंगझेबाचा मृत्युदिन) इतका काळ तो सत्तेवर होता. औरंगजेबाने एकूण ४८ (काही साधांनुसार ५१) वर्षे राज्य केले. आपल्या शिवरायांचे आयुष्य ५० वर्षांचे आणि त्यांच्या आयुष्याइतके औरंगझेबाने राज्य केले व शहाजी भोसले, शिवाजी भोसले व संभाजी भोसले अशा ३ पिढ्या औरंगझेबाने पाहिल्या. सत्तेवर आल्यापासून ते तो स्वतः मरेपर्यंत कोणीही त्याची सत्ता हिसकावू शकला नाही इतकी मजबूत पकड त्याची स्वतःच्या सत्तेवर होती.
औरंगजेब – एक नजर
औरंगजेब समजणे तसे विचित्र व अवघड आहे. वसंत कानेटकर आपल्या पुस्तकात औरंगजेबाचा उल्लेख करतांना म्हणतात “मोघलांत औरंगजेबाइतका बुद्धिमान, हुशार पण मूर्ख, कर्तबगार पण लबाड व कपटी, धर्मवेडा, विश्वासघातकी, खोटारडा, काव्यप्रेमी पण कलाद्वेष्टा, मठ्ठ पण मुत्सद्दी, प्रेमळ पण दुष्ट, सफाईने पाप करणारा पण ईश्वराला भिणारा, पुत्र, पिता व भावंडांचा छळ करणारा, साध्या राहणीचा पण इतरांच्या पीडेत आनंद मानणारा, जिद्दी, हट्टी पण भित्रा, स्वार्थी आणि जिहादासाठी सिद्ध असणारा असा दुसरा बादशहा निर्माण झाला नाही”. या वाक्यावरून औरंगझेब किती वेगळे व्यक्तिमत्त्व होते हे लक्षात येते.
औरंगझेब स्वभावाने विलासी, रंगेल वगैरे नव्हता, तसा तो सद्वर्तनी होता. स्त्रियांच्या बाबतीत त्याने स्वतःच्या बायका सोडून कोणाशीही गैरसंबंध ठेवले नाहीत. स्त्रियांवर कधी त्याने अत्याचार केले नाहीत. बहादूरगडाच्या किल्लेदाराने संभाजी महाराजांच्या एका नाटकशाळेवर बलात्कार केला हे औरंगझेबाच्या कानी आल्याबरोबर त्याचे हातपाय तोडण्याची सजा औरंगजेबानी सुनावली होती.
औरंगजेबाबद्दल असे सांगितले जाते कि, तो धर्मवेडा तर होताच पण मी पाप करतो म्हणून तो त्याला मृत्यूनंतर काय शिक्षा होईल हा विचार करून घाबरत असे. यासाठी, कपट, कारस्थान किंवा मृत्यूचे वगैरे आदेश देताना तो आपल्या मौलवींकडून किंवा अधिकाऱ्यांकडून अंतिम निर्णय वदवून घेई. या मागे त्याची अशी धारणा होती कि हे पाप माझी इच्छा असली तरी मौलवींच्या तोंडून करण्याचा आदेश आला आहे, त्यामुळे अल्ला मला नाही तर मौलवींना शिक्षा करेल. आता याला कोणते धर्मवेड म्हणावे ?
साकी मुस्तैद खान याने लिहिलेल्या ‘मासिरी अलामगिरी’ मध्ये तो औरंगजेबाबद्दल सांगतो कि, “विद्वान, नीतिमान अशा आदर्श मनुष्यात जे गुण आवश्यक आहेत ते सर्व दैवी संपदेने युक्त असलेल्या बादशहात एकवटलेले होते. समजू लागण्याच्या वयापासून, बादशहाने धर्मविहित गोष्टी कोणत्या आणि निषिद्ध कोणत्या, याची पूर्ण माहिती करून घेतली होती. त्याचा इंद्रियनिग्रह दांडगा होता, धर्माने परवानगी दिलेल्या सुखाचाच तो उपभोग घेई. आपल्या विवाहित स्त्रियांना सोडून त्याने इतर स्त्रियांशी कधीही व्यवहार केला नाही.
धर्माने निषिद्ध मानलेली वस्त्रे बादशहा कधीही वापरत नसे. त्याने सोन्या-चांदीची पात्रे (भांडी) कधीही वापरली नाहीत. त्याच्या बैठकीत चहाड्या, चुगल्या, हेवेदावे इत्यादींनी युक्त असलेले अभद्र शब्द कधीही उच्चारले जात नसत. बादशहाच्या दरबारात कुणाही दाद मागणाऱ्यांना मज्जाव नसे. दिवसातून दोन-तीन वेळा तो न्यायालयात उभा राहून न्यायदान करीत असे.”
तर मंडळी आता सुरुवातीला मी म्हणालो त्याप्रमाणे तुम्हालाही औरंगझेब कुणी साधासुधा व्यक्ती नव्हता हे लक्षात आले असेल आणि सोबतच शिवरायांनी व मराठ्यांनी किती मोठ्या बलाढ्य शत्रूशी सामना केला होता हे देखील कळून आले असेल. औरंगजेब म्हणजे खरे सांगायचे तर असंख्य विसंगतींनी भरलेले एक गहनगूढ व्यक्तिमत्त्व होते असे औरंगझेबाचे एका वाक्यात वर्णन करता येईल.
Story English Title: Story know more about Aurangzeb Badshah unknown Things History on Maharashtranama.
संबंधित कथा
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News