15 November 2024 6:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

मी सिंहगड बोलतोय . . . . . .

Story, Mi Sinhagad Boltoy, Atihasik Katha

खुप दिवसांपासुन सिंहगडाची भटकंती करण्याचे मनात होते. पण योग काही जुळुन येत नव्हता. बहुतेक गडकोटांची भटकंती केली होती, पण पुण्यापासुन अगदी जवळ असलेला हा गड काहि अद्याप पाहिला नव्हता. काही आठवड्यापूर्वी एका मित्राचा दिल्लीवरून फोन आला कि तो गणपतीसाठी २ आठवड्याची सुट्टी टाकुन मुंबईला येतोय. तेंव्हा एका दिवसात शक्य होईल असा एखादा छोटासा ट्रेक प्लान कर. मग काय सिंहगड पाहायचा होताच त्यामुळे सिंहगड भटकंतीचाच बेत फिक्स केला आणि त्याप्रमाणे माबोकर वर्षा_म आणि सुर्यकिरणकडुन स्वारगेटवरून कसे जायचे ते विचारून घेतले.

पण आयत्यावेळी शनिवारचे जाणे रद्द झाल्याने रविवारी जायचे ठरले. रेल्वेचे बुकिंग फुल्ल असल्याने पहाटे ठाण्याहुन शिवनेरीने स्वारगेट आणि पुढे सिटीबसने सिंहगड पायथा असा फायनल बेत ठरला. ठरल्याप्रमाणे आम्ही चौघे (मी, माझे दोन मित्र आणि माझा कॅमेरा ) असे सकाळी साडेदहाच्या सुमारास सिंहगडाच्या पायथ्याशी पोहचलो. तसे सिंहगडावर डोणजे गावातुन गाडीने थेट गडाचा माथा गाठता येतो, पण आम्ही चालतच गड सर करण्याचा निर्णय घेतला. पायथ्यापाशी असलेल्या गावातच मस्तपैकी न्याहरी आटपून गड चढण्यास सुरूवात केली. रमतगमत साधारण दिड-दोन तासात गडावर पोहचु असा आमचा मानस होता. मी आपला निसर्गाचे, झाडांचे, पानाफुलांचे फोटो काढत सावकाश चालत होतो (अर्थात याला थोडे कारण वाढलेलं वजनही होते ). एव्हाना बरोबर चालणारे माझे दोन मित्र पुढे गेले. थोडा दम लागल्यामुळे एका जागी मी थोडावेळ बसलो.

“काय रे दमलास का?” एक धीरगंभीर आवाज कानावर आला.

“हो रे. बर्‍याच दिवसांनी ट्रेकला निघालो ना म्हणुन जरा दमलोय. थोडावेळ बसतो, मग निघतो पुढे.” माझ्या दोन्ही मित्रांपैकी कुणीतरी विचारले असे समजुन मी उत्तरलो.

“काय तुम्ही आजकालची तरूण मंडळी, तासभर जरी चाललात तरी दमतात. आमच्या वेळेचे मावळे बघ, हे असे आणि यापेक्षा कितीतरी अवघड गड एका दमात चढत/उतरत असे आणि पुन्हा त्याच दमाने शत्रुशी लढाईही करत.” पुन्हा तोच आवाज.

मावळे, शत्रु, लढाया ऐकुन आता मात्र मी थोडा दचकलो. हा आवाज माझ्या मित्रांपैकी कुणाचाच नाही हे नक्की. आजुबाजुला पाहिले तर कुणीच नव्हते. समोर दिसणारा सिंहगडाचा माथा आणि फक्त मी मनातुन थोडा घाबरलो. तसाच उठुन भरभर चालु लागलो.

“मित्रा, तु मला भेटायला आला आहेस आणि असा घाबरतोस का?” पुन्हा तोच आवाज.

“क् क् कोण बोलतय? आणि समोर का येत नाही?” माझा आवाज आता कापरा झाला.

“मला भेटायला आलास आणि मलाच ओळखले नाहीस?” अरे मी “सिंहगड बोलतोय”.

“क् क् कोण सिंहगड किल्ला?” आता मात्र बेशुद्ध होण्याची वेळ माझ्यावर आली होती.

“हो, मीच. प्रत्यक्ष “सिंहगड”, ज्याला भेटायला तु मुंबईहुन आला आहे तोच मी किल्ले कोंढाणा उर्फ सिंहगड.”

एव्हाना माझी अवस्था विचित्र झाली होती. ज्याला भेटायला इथवर आलो होतो तो सिंहगडच प्रत्यक्ष माझ्याशी बोलतोय. अविश्वसनिय वाटत होते पण खरं होतं.

“चल, मी तुला सोबत करतो गडमाथ्यावर पोहचेपर्यंत.” सिंहगड म्हणाला.

एव्हाना माझी भीड थोडी चेपली होती. मीही थोडासा घाबरतच तयार झालो पुढे जाण्यास. पण आनंदही झाला होता कारण गडमाथा गाठेपर्यंत प्रत्यक्ष सिंहगडाची सोबत होती नां!!!!!

चालता चालता सिंहगडाने बोलावयास सुरूवात केली. “लहानपणी इतिहासाच्या पुस्तकातुन, चित्रातुन, ऐतिहासिक कथा-कादंबर्‍यांमधुन, आंतरजालाच्या माध्यमातुन आपण नेहमीच भेटत आलो. पण प्रत्यक्षातील हि पहिलीच भेट. लहानपणी शाळेत असताना जो इतिहास कंटाळवाणा वाटत असे तोच आता दर्‍याखोर्‍यात हिंडत अभ्यासावा वाटतो नां?. चल आज मी तुला माझी पुन्हा एकदा ओळख करून देतो.” “माझा जन्म शेकडो वर्षापूर्वी सह्याद्रीच्या भुलेश्वर डोंगररांगात झाला.” सिंहगडाने बोलावयास सुरूवात केली. “माझे पूर्वीचे नाव “कोंढाणा”. १६४७ साली शिवरायांनी मला स्वराज्यात आणले, त्याआधी मी आदिलशाही राजवटीत होतो. स्वराज्यात सामील होणे हे माझ्यासाठी खुप आनंदाचे होते, पण माझा हा आनंद फार काळ टिकला नाही. पुढे १६४९ साली शहाजीराजांच्या सुटकेसाठी मला पुन्हा आदिलशाला परत करण्यात आले. पुढे ऐतिहासिक पुरंदरच्या तहात जे किल्ले मुघलांना दिले त्यात मी सुद्धा होतो . राजे जेंव्हा आग्र्याहुन सुटुन परत आले तेंव्हा तहात दिलेले किल्ले परत घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी उदेभान राठोड हा गडावर मुख्य अधिकारी होता. तो स्वतः डोळ्यात तेल घालुन माझी राखण करायचा, त्यामुळे कुणाची टाप नव्हती माझ्याकडे बघण्याची. स्वराज्यावर वचक ठेवण्यासाठी तेथे औरंगजेबाने जसवंतसिंगला पुण्याकडे पाठवले होते.

जसवंतसिंग एकदा का कोंडाण्याजवळ आला तर गड जिंकणे कठिण होईल हे महाराजांनी ओळखले होते. त्यामुळे जितक्या लवकर मला स्वराज्यात सामील करता येईल तितक्या लवकर करायचे असे महाराजांनी ठरवले. हि मोहिम एकाच दिवसात फत्ते करायचे ठरली. महाराजांचा विश्वासु सुभेदार तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायबाचे लग्न असल्याने महाराज स्वतः या मोहिमेवर निघण्यास तयार झाले. तानाजीला जेंव्हा हे समजले तेंव्हा “आधी लगीन कोंडाण्याचे, मग माझ्या रायबाचे” अशी गर्जना करत त्याने गड जिंकण्याचे कबुल केले. ४ फेब्रुवारी १६७२च्या त्या रात्री घोरपडीच्या सहाय्याने गडावर चढुन मर्द मावळ्यांनी केलेला पराक्रम तर सर्वश्रुत आहेच. उदेभान आणि तानाजी यांच्यातला तो घनघोर रणसंग्राम मी याची देही याची डोळा पाहिला. तानाजीच्या डाव्या हातातील ढाल तुटली तर तो पठ्ठा डाव्या हाताचीच ढाल करून लढला. अखेर दोघेही रणांगणात पडले. नंतर सुर्याजी मालुसरे याने उरलेल्या मावळ्यांना हिम्मत देऊन विजय मिळवला. तानाजी गेल्याची बातमी महाराजांना समजताच ते म्हणाले, “गड आला पण माझा सिंह गेला” आणि तेंव्हापासुन माझे नाव “सिंहगड” झाले.. पुढे राजाराम महाराजांनी वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी येथेच देह ठेवला. हे सगळे सांगताना सिंहगडाचा स्वर गदगदला.

हा सगळा रोमांचकारी इतिहास प्रत्यक्ष सिंहगडाकडुन ऐकताना माझी छाती अभिमानाने फुलुन आली आणि मी भारावलेल्या अवस्थेत हे सगळे ऐकत पुढे पुढे चालत होतो. इतिहासाचे असेच पारायण करत आम्ही पुढे चाललो.

इतक्यात एक गृप दंगामस्ती करत माझ्यासमोरून गेला आणि सिंहगडाचा आवाज बंद झाला.

” हे, हे असेच चालु आहे सध्या येथे. जो तो उठतोय आणि ट्रेकिंगच्या नावाखाली धुमाकुळ घालतोय.” रागावल्या स्वरात सिंहगड पुन्हा बोलु लागला.

“का? काय झाले?” मी सहजच विचारले.

“आताच बघितला ना ते लोकं कसे दंगामस्ती करत, आरडाओरडा करत गेले ते? जेंव्हापासुन माथ्यापर्यंत वाहने यायला लागली तेंव्हापासुन हा असा गोंधळ सहन करतोय मी. काही अपवाद सोडले तर ट्रेकिंगच्या नावाखाली उच्छाद मांडलाय.” सिंहगड चिडुन बोलत होता.

“पण मग आम्ही विरंगुळ्यासाठी कोठे जायचे? आणि . . . . .”

“विरंगुळ्यासाठी…????” माझे वाक्य अर्धवट तोडत चिडलेल्या स्वरात सिंहगड म्हणाला.

“अरे, हि ऐतिहासिक ठिकाणे तीर्थक्षेत्रांइतकीच पवित्र आणि महत्वाची आहेत. त्यांना विरंगुळ्याचे साधन बनवू नका. मौजमस्तीच करायची असेल तर समुद्रकिनारी, रीसॉर्टमध्ये जा आणि तेथे धुडगुस घाला. परकियांच्या आक्रमणाने झाले नसतील त्यापेक्षा कितीतरी पटीने तुम्ही माझे हाल करत आहात. जे आयुष्यात कधीही गड किल्ले चढले उतरले नाही ते आता थेट गाडीरस्ता माथ्यापर्यंत झाल्यामुळे फक्त टाईमपाससाठी येथे येऊ लागले आणि माझे वातावरण पार बिघडुन गेले. तुम्ही टाकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, काचा, केरकचरा यांनी माझा श्वास कोंडला जाउ लागला आहे. गड माथ्यावरही आज जागोजागी हॉटेल्स दिसु लागली आहे. पूर्वी हे सगळे पाहुन मला आनंदच झाला होता कि स्थानिक लोकांना निदान रोजगार तरी मिळाला. पण पुढे तुमची भूक वाढतच गेली आणि आता मला एखाद्या बाजाराचे स्वरूप आले आहे. आजही बरेचजण “सिंहगडला जातोय ना, तर तेथील कांदाभजी, मडक्यातले दही आणि पिठंल भाकरी नक्कीच खा” असा सल्ला देतात. पण कुणीही असे सांगत नाही कि सिंहगडावर जातोय तर तानाजी कडा, कल्याण दरवाजा, तानाजींची समाधी अवश्य बघा.

तानाजी मालुसर्‍यांनी ज्या कड्यावर चढुन इतिहास घडवला त्यालाही तुम्ही आता विण्ड पॉईण्ट म्हणायला लागला आहात. पुरातत्व खाते, सरकार आणि तुमच्या अनास्थेमुळे आज ज्या ठिकाणी माझ्या मर्द मावळ्यांची रक्त सांडले त्याच ठिकाणे आता पान्-गुटक्याच्या पिचकार्‍या दिसतात. जेथे मी तलवारींचा खणखणाट ऐकला तेथे आज गाड्यांचे कर्कश हॉर्न, मोबाईलमधील मोठ्या आवाजात लावलेली गाणी ऐकावी लागतात. ज्या राजाच्या राजवटीत स्त्रियांना आईची उपमा देऊन गौरवण्यात आले त्याच भूमीत आज मुली बिनधास्त तोकडे कपडे घालुन, मित्रांच्या गळ्यात गळे घालुन फिरत आहेत. जेथे मावळ्यांच्या डोळ्यात स्वराज्याची झिंग अनुभवली तेथेच आजच्या तरूणांना मद्यपानाने झिंगलेल्या अवस्थेत पहावे लागत आहे. शनिवार रविवारी तर मला एखाद्या जत्रेचे स्वरूप येते. यातील फार कमीजण फक्त मला जाणुन घेण्यासाठी येतात बाकी सगळेच केवळ मौजमजेसाठीच. हिच स्थिती थोड्या फार फरकाने सह्याद्रीतील माझ्या इतर भावंडांची झाली आहे. ऊन, वारा, पाऊस, परकीय आक्रमण यांना कधीही न जुमानणारे आम्ही तुमच्या असल्या कृत्याने पार खंगत चाललो आहोत.”

“नरवीर तानाजी मालुसरे आणि इतर नररत्नांच्या पराक्रमामुळे पावन झालेला हा सिंहगड आता मात्र “रेव्ह पार्टीमुळे” बदनाम झालाय.” एक दीर्घ उसासा टाकत सिंहगड म्हणाला आणि मी अपराध्यासारखे सगळे ऐकत राहिलो.

तेव्हढ्यात कानावर गाड्यांचे कर्कश हॉर्न आणि माणसांचा गोंगाट ऐकु आला आणि गडमाथा जवळ आल्याची चाहुल लागली.

“चल, मित्रा मी निघतो आता. तुमच्या माणसांच्या गर्दीत जीव घुसमटतो माझा”. इतकं बोलुन तो आवाज लुप्त झाला आणि मी कावर्‍याबावर्‍यासारखे इकडे तिकडे पाहु लागलो.

“योगेश, अरे होतास कुठे इतका वेळ? आम्हाला गडावर पोहचुन बराच वेळ झाला.” मित्रांचा आवाज कानावर पडताच मी भानावर आलो. .

गडमाथ्यावर पोहचताच सिंहगडाने सांगितल्याप्रमाणे जागोजागी हॉटेल्स, तरूणतरूणींचा गोंधळ, मोबाईल-गाड्यांचे आवाज, पान-तंबाखु, गुटक्याच्या पिचकार्‍या, सर्वत्र पडलेला प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच दिसु लागला. काही न बोलता सुन्नपणे गडावर फिरत होतो. कानात सिंहगडाचा तोच धीरगंभीर आवाज अजुनही घुमत होता.

राहुन गेलेल्या बातम्या

x