Battle of Pavan Khind | पावनखिंडीत ३०० मराठ्यांनी १० हजार मुघलांना पाणी पाजलं होतं | थरकाप उडवणारं युद्ध

शिवरायांनी आपल्या हयातीत अनेक पराक्रम केले आणि भल्या भल्या शत्रुंना सळो कि पळो करून सोडले. परंतु, स्वराज्यात असेही काही धाडसी मावळे आणि सरदार होते कि ज्यांचा पराक्रम पाहून स्वतः शिवाजी महाराज अवाक झाले, त्यांच्यासाठी स्वतः महाराजांनी अश्रू ढाळले आणि अशा वीरांपुढे तेही नतमस्तक झाले. अशाच एका वीराची आठवण आज आपण करीत आहोत ज्यांनी इतिहासाला एक बोचरा, अंगावर काटा आणणारा आणि अविश्वसनीय असा प्रसंग दिला, आपल्या बलिदानाने त्या व्यक्तीने आपली स्वामीनिष्ठा आभाळापेक्षा उंचीवर नेऊन ठेवली आणि शिवचरित्रात स्वतःचे अढळ असे स्थान निर्माण केले.
पावनखिंडीत ३०० मराठ्यांनी १० हजार मुघलांना पाणी पाजलं होतं, थरकाप उडवणारं युद्ध – The Battle of Pavan Khind story :
बाजी प्रभू देशपांडे, हे नाव जरी ऐकलं तरी आपल्या समोर उभी राहते भरभक्कम आणि हातात दांडपट्टे घेऊन रक्तबंबाळ होऊनसुद्धा शत्रूला यमसदनी पाठविणारी मुद्रा !
या बाजीप्रभूंचा जन्म साधारण १६१५ साली झाला असा अंदाज बांधला जातो. पुणे जिल्ह्यात भोर नावाचा तालुका येतो, या भोर तालुक्याचे बाजीप्रभू हे पिढीजात देशपांडे होते. बाजीप्रभूंची हुशारी, त्यांचे बळ आणि कौशल्य पाहून शिवरायांनी त्यांना आपल्या स्वराज्य मोहिमेत सहभागी केले आणि पुढे मरेपर्यंत बाजीप्रभू शिवरायांशी एकनिष्ठ राहिले.
पन्हाळगडाला वेढा:
बाजीप्रभू यांचे नाव घेतले कि आपल्याला पावनखिंडीची हमखास आठवण होते. याच प्रसंगात शत्रूशी लढताना बाजीप्रभूंनी आपले प्राण त्यागले आणि शिवरायांप्रती आपली निष्ठा सिद्ध केली. शिवाजी महाराज पन्हाळगडावर आपल्या सैन्यासह होते, पन्हाळगडाला सिद्दी जोहर याने जबरदस्त वेढा दिला आणि मराठे फसले. पन्हाळगड हा वेढा यशस्वीपणे लढवू शकेल इतका सक्षम होता म्हणून शिवराय जरा निर्धास्त होते परंतु त्यातच दोन मोठ्या गोष्टी कानावर आल्या, पहिली अशी कि शिवराय इथे पन्हाळ्यावर वेढ्यात अडकले असतांना तिकडे शायिस्तेखानाने पुण्यावर हल्ला केला होता. त्यामुळे त्याच्या हालचालींना बांध घालणे गरजेचे होते आणि दुसरे असे कि, सिद्दीला सोबत करण्यासाठी इंग्रज अधिकारी रेविंग्टन हा उखळी तोफ जी स्फोटकं भरलेले तोफेचे गोळे मारू शकते, ती घेऊन पन्हाळगडाच्या वेढ्यात सामील झाला आणि त्या तोफेपुढे पन्हाळा तग धरणे मुश्किल होते हे शिवरायांना कळून चुकले.
वेढा तोडण्याचे आणि तह करण्याचे अनेक प्रयत्न मराठ्यांकडून केले गेले परंतु ते केवळ निष्फळ ठरले. शेवटी पन्हाळा किल्ला सोडून पलायन करणे आणि घोडखिंडीच्या मार्गाने विशाळगडाकडे पोहोचणे असे शिवरायांनी ठरविले. दिवस जुलै महिन्यातील मुसळधार पावसाचे होते, परंतु तरीही हीच नीती वापरून शिवरायांना पन्हाळगडावरून सुखरूप जाणे शक्य होते त्यामुळे सारेचजण याला सहमत झाले.
बाजींच्या स्वामीनिष्ठेचा प्रत्यय:
ठरलेल्या योजनेप्रमाणे शिवरायांचा वेष करून शिवा काशीद काही सैन्यासोबत मुद्दाम सिद्दीच्या हाती पकडले गेले आणि गुप्त रस्त्याने शिवाजी महाराज आणि त्यांच्यासोबत ६०० सैन्य असा लवाजमा विशाळगडाकडे रवाना झाला. आपल्या हाती लागलेले शिवाजी हे खोटे असल्याचे लगेचच सिद्दीच्या लक्षात आले आणि त्यांने आपला जावई सिद्दी मसूद याला सारे सैन्य घेऊन शिवराय ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने पाठलाग करण्यास पाठविले. इकडे शिवरायांना समजले कि विशाळगडावर आपण जाणार आहोत त्या गडावर देखील आपल्या शत्रूंनी वेढा दिला आहे, त्यामुळे तोही वेढा तोडणे गरजेचे आहे.
जुलै महिन्यातील अंधारी रात्र, रात्री मुसळधार कोसळणारा पाऊस, बरं हल्ली असते तशी काही विजेची सोय तेव्हा नव्हतीच त्यामुळे मशालींच्या उजेडात रस्ता तुडवत मराठी सैन्य आगेकूच करीत होते. मराठ्यांच्या सैन्याला चाहूल लागली कि सिद्दीचे सैन्य आपल्या मागावर आहे. मराठे चालत चालत गजापूरच्या घोडखिंडीत पोहोचले. बाजीप्रभूंनी शिवरायांना सांगितले, “राजे, आपले सैन्य अनेक तास चालून थकले आहे, आपण सारे असे चालत राहिलो तर सिद्दीचे ताज्या दमाचे सैन्य आपल्याला सहज गाठेल, त्यापेक्षा राजे तुम्ही काही सैन्य घेऊन पुढे विशाळगडाकडे निघा आणि मी काही सैन्य घेऊन या घोडखिंडीत सिद्दीच्या सैन्याला रोखून धरतो.
राजे म्हणाले, “बाजी अहो शत्रूचे सैन्य सुमारे १०,००० आणि तेही ताज्या दमाचे, आपण मात्र ६०० ! आपण यांचा मुकाबला कसे करणार?” यावर आपले बाजी म्हणतात, “राजे, तुम्ही ३०० सैन्याची तुकडी घेऊन विशाळगडाकडे रवाना व्हा आणि उरलेल्या ३०० सैनिकांना घेऊन मी घोडखिंडीत थांबतो, तुम्ही विशाळगडाचा वेढा फोडून गडावर पोहोचलात कि तोफेचे ५ बार करा म्हणजे तुम्ही सुखरूप पोहोचलात याची मला खबर मिळेल.”
राजे काहीवेळ बाजीकडे पाहत राहिले, राजे उद्गारले बाजी, “१०,००० विरुद्ध ३०० हे कसे शक्य होईल ?”
बाजीप्रभूंनी यावर उत्तर दिले, “राजे, हा बाजी जो पर्यंत या खिंडीत उभा आहे तोपर्यंत एकाही गनिमाला या खिंडीच्या पार होऊ देत नाही, तुम्ही तोफेचे बार करीत नाही तोपर्यंत हा बाजी मरणार देखील नाही.
पावनखिंड:
ठरल्याप्रमाणे शिवराय ३०० सैन्य घेऊन विशाळगडाकडे निघाले आणि बाजीप्रभू आपल्या ३०० सैन्यासह सज्ज होते. घोडखिंडीच्या तोंडालाच बाजींनी सैन्याची १०० ची एक तुकडी तैनात केली, त्यांच्या मागे अजून अशा सैन्याच्या फळ्या बाजींनी उभ्या केल्या आणि खिंडीत शिरल्यावर पुढे चढ होता. त्या चढात ५० मावळे उभे केले आणि खिंडीतून पलीकडे जाण्याचा जो मुख्य भाग होता त्या भागातून एका वेळी साधारण ५/१० माणसेच जाऊ शकतील असा होता. त्या मुख्य भागावर स्वतः बाजीप्रभू दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन उभे राहिले. कोणत्याही क्षणी सिद्दीचे सैन्य आणि तेही अगदी ताजेतवाने आपल्यावर चालून येईल आणि आपण मात्र दमलेले, तरीही एकाही मावळ्याने माघार घेतली नाही. १०,००० विरुद्ध ३०० अशी हि थरारक लढाई होणार होती.
ठरल्याप्रमाणे मराठे सज्ज झाले, समोरून सिद्दीच्या सैन्याचे लोंढे येऊ लागले आणि “हर हर महादेव” असं म्हणत मराठे जोरदार प्रतिकार करीत सुटले. आपला एक मावळा देखील गनिमाच्या १० माणसांना महागात पडत होता. मराठ्यांची पहिली, दुसरी आणि तिसरी अशा फळ्या मोडून जे सैन्य पुढे येईल ते सैन्य चढात मराठ्यांच्या ५० च्या तुकडीने संपवायचे आणि त्यातूनही जे गनीम निसटतील ते सरळ बाजीप्रभूंच्या दांडपट्ट्याने यमसदनी धाडले जातील अशी आपली रचना होती.
घमासान लढाई सुरु होती, सिद्दी हे सारे पाहत होता, त्यालाही प्रश्न पडला होता कि हे ३०० मराठे माझ्या इतक्या मोठ्या सैन्याला महागात कसे बरं पडतात. बऱ्याच वेळाने सिद्दीच्या लक्षात आले कि त्याचे सैन्य मराठ्यांना मात देत आहे परंतु खिंडीच्या पलीकडे एकही सैनिक जाऊ शकला नव्हता, याचे कारण काय असावे ? सिद्दीने पाहिले तेव्हा त्याच्या लक्षात आले आणि तो चाट पडला कारण त्याला दिसत होती एक मुद्रा.
केसांचा तुळतुळीत गोटा त्याला एक शेंडी, साधारण ६ फूट उंच आणि रोज अनेक तास कसरत करून भक्कम झालेले भारदस्त शरीर, पिळदार मिश्या अगदी समशेरीसारख्या आणि दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन गरागरा फिरवीत शत्रूच्या मुंडक्या उडविणारी मुद्रा… हि मुद्रा होती खुद्द बाजीप्रभू देशपांडे यांची, किल्ल्याचा भक्कम बुरुज उभा असावा तसे बाजी खिंडीत उभे होते आणि त्या एका माणसाला पार करून कोणीही खिंडीपलीकडे जाऊ शकत नव्हते.
अनेक तास हि लढाई चालू होती, तिकडे शिवराय सैन्यासह विशाळगडाकडे पोहोचले आणि विशाळगडाचा वेढा फोडण्याच्या लढाईत गुंतले आणि इकडे शत्रूचे सैन्य एकट्या बाजीप्रभूंना पार करून खिंड ओलांडू शकत नव्हते. संध्याकाळ होत आली तरी सिद्दीचे सैन्य काही खिंड ओलांडू शकत नव्हते, शेवटी सिद्दीने बंदूकवाला इंग्रज बोलाविला आणि त्याला बाजीप्रभूंना मारण्यास सांगितले. तोपर्यंत बाजीप्रभू इतक्या आवेशात लढत होते कि अंगावर अशी एकही जागा शिल्लक नव्हती जिकडे जखम झाली नाही. तरीही त्यांच्या समोर येणार शत्रू काही खिंडीच्या पार होईना इतकी अफाट शक्ती बाजी दाखवीत होते.
Pavan Khind Battle and Bajiprabhu Deshpande :
शेवटी रक्ताने लालबुंद झालेल्या बाजींना इंग्रजाने माचीवर चढून नेम लावून बंदुकीतून गोळी मारली आणि गोळी जाऊन थेट बाजींच्या छातीवर लागली. बाजी पडले आणि मग विशाळगडाकडे पाहत स्वतःशीच बोलले,
“जो पर्यंत तोफेचे बार ऐकत नाही तोपर्यंत हा बाजी मारतोच कसा !” असं म्हणून बाजी पुन्हा उठले आणि पुन्हा दांडपट्टे घेऊन शत्रूचे मुंडके चेंडूसारखे भिरकावून देत होते.
अखेर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी बाजी रक्ताने झाकले गेले, जखमांवर नव्या जखमा झाल्या होत्या आता अंगावर जखम होण्यास सुद्धा जागा शिल्लक नव्हती आणि अशातच एक मावळा आला म्हणाला बाजी आवं विशाळगडाकडून काही धूर आल्यागत वाटतंया आणि असं म्हणताच विशाळगडावर शिवाजी राजे सुखरूप पोहोचल्याचे बार वाजायला सुरुवात झाली. तोफेचा पहिला बार झाला आणि बाजी हसले, तरीही दांडपट्टा आणि शत्रूचे मुंडके अशी हाताची लढाई चालूच पण सारे लक्ष मात्र तोफेच्या आवाजाकडे. दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा बार जसा बाजीप्रभूंच्या कानी पडला तसा बाजींनी आपला रक्ताने लालबुंद झालेला देह सोडला.
बाजी धाडकन जमिनीवर कोसळले, सारे मराठे थांबले, सारे म्हणजे ३०० पैकी जेमतेम ४०/५० शिल्लक असावेत आणि बाजींनी आपला शब्द खरा केला. छातीत गोळी असूनसुद्धा बाजी उभे राहिले आणि शत्रुला मात दिली पण मृत्यूलाही त्यांनी थांबविले. “अरे जो पर्यंत तोफेचे बार कानावर पडत नाहीत तोपर्यंत तू (मृत्यू) सुद्धा मला इथून घेऊन जाऊ शकत नाहीस”, या निष्ठेला मोजमाप नाही!
दिनांक १४ जुलै १६६० रोजी बाजीप्रभू धारातीर्थी पडले. आदल्या रात्री पन्हाळगडावरून निघालेले हे सैन्य पहाटे घोडखिंडीत पोहोचले आणि पहाटे घोडखिंडीत थांबलेले ते ३०० सैन्य १४ जुलैच्या संध्याकाळपर्यंत लढाई करीत होते, म्हणजे जवळजवळ बाजीप्रभू आणि मराठे ११/१२ तास लढत होते आणि तेही १०,००० संख्या असलेल्या सैन्याशी. बाजीप्रभूंच्या शौर्याची व्याख्या करणे देखील आपल्याला शक्य होणार नाही. वि. दा सावरकर यांनी याच प्रसंगावर एक काव्य लिहिले त्याच्याच काही ओळी बाजीप्रभूंच्या आठवणीत आपण पाहू. सावरकर लिहितात,
“तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला, अन चला घालू स्वातंत्र्यसंगरी रिपुवरी घाला.”
खरंच, अशा निष्ठावान बाजींच्या पराक्रमामुळे त्या घोडखिंडीला पावनखिंड असे म्हंटले जाते. अशाच अनेक वीरांच्या बलिदानाने आपले शिवराय घडले आणि छत्रपती झाले आणि शिवरायांनी सुद्धा एकाही मावळ्याचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले नाही. असा राजा ज्याच्यासाठी सैनिक स्वतःचा प्राणही देतो आणि असा सैनिक जो राजासाठी स्वतःच्या मृत्यूलाही वाट पाहायला भाग पडतो, दोन्हीही धन्य म्हणावे लागतील.
बोला हरहर महादेव !!!
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.
Story Title: The Battle of Pavan Khind story.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित कथा
राहुन गेलेल्या बातम्या
-
GTL Infra Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ जीटीएल इन्फ्रा शेअर, महत्वाची अपडेट आली - NSE: GTLINFRA
-
TATA Motors Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने दिला खरेदीचा सल्ला, BUY रेटिंग सह टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | 530 रुपये टार्गेट प्राईस गाठणार वेदांता शेअर, डीमर्जर प्लॅनिंगमुळे पुढे मोठी कमाई होणार - NSE: VEDL
-
Disha Salian l बिहार निवडणूक जवळ आली, पुन्हा तेच, अनेकांना माहित नसलेले दिशा सालियन प्रकरणातील मुद्दे
-
TATA Motors Share Price | रेलिगेअर ब्रोकिंग फर्म बुलिश, टाटा मोटर्स टार्गेटशेअर्स खरेदीला गर्दी, संधी सोडू नका - NSE: TATAMOTORS
-
IREDA Share Price | मागील ६ महिन्यात शेअर 33% घसरला, इरेडा शेअर्स पुढे BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर्स देणार मोठा परतावा, सध्या स्वस्तात खरेदीची संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनी शेअर्स सुस्साट तेजीत, तज्ज्ञांनी दिली होल्ड रेटिंग, टार्गेट जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | उच्चांकापासून 53 टक्क्यांनी घसरलेला इरेडा शेअर्स खरेदीला गर्दी, टार्गेट जाणून घ्या - NSE: IREDA
-
TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, पैशाने पैसा वाढवा - NSE: TATAMOTORS